भाईंदरच्या तरुणाची सेंद्रीय शेती : भाजीपाला पिकवून थेट बाजारात विक्री

अनेक चित्रपट, मालिका, माहितीपटांच्या चित्रीकरणासाठी भाईंदर परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा त्याचा व्यवसाय. मात्र एका शेतीविषयक मालिकेच्या चित्रीकरणासाठी जागा दाखवताना त्यालाही प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातील शेतकरी जागा झाला. मग त्याने स्वत: भाजी पिकवायला सुरुवात केली. केवळ सेंदिय खताचा वापर करत पिकवलेली ही भाजी भाईंदरच्या बाजारात त्याने रहिवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. स्वस्त आणि ताजा भाजीपाला भाईंदर (पश्चिम) येथील पोलीस ठाण्याच्या नाक्यावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘किसान समाज’ या नावाची पाटी असलेली त्याची गाडी सध्या भाईंदर पोलीस ठाण्यासमोर सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहेत.

शासनाच्या ‘संत शिरोमणी श्री सावतामाळी आठवडे बाजार अभियाना’अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजी स्वत: शेतकरीच विकतात. भाईंदरमध्येदेखील शेतकऱ्यांना बाजारासाठी जागा देऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता, परंतु सध्या तरी हा उपक्रम बारगळा आहे. मात्र शासनाच्या या योजनेतून स्फूर्ती घेऊन भाईंदरच्या अनिल नौटियाल या युवकाने स्वत:च भाजी पिकवून ती भाईंदरच्या बाजारात विकायला सुरुवात केली आहे. केवळ शेणखताचा वापर करून पिकवलेल्या लाल माठ, मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या विक्रीसाठी भाईंदर (पश्चिम) येथील बाजारात येऊ लागल्या आहेत.

नौटियाल यांचा मूळचा चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यायचा व्यवसाय आहे. गावी शेती करीत असले तरी शहरात शेतीशी त्यांचा संबंधच तुटला होता. अशाच एका वाहिनीसाठी शेती या विषयावरील मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी त्यांनी उत्तन येथील जागा उपलब्ध करून दिली. या मालिकेद्वारे शेती कशी करायची याची माहिती दिली जायची. त्याचे बारकाईने निरीक्षण नौटियाल यांनी केले आणि स्वत:च शेती करण्याचा विचार त्यांच्या मनात चमकला. जमीनमालक  गणेश सावंत यांच्याशी विचारविनिमय करून त्यांनी भागीदारीत शेती करायला सुरुवात केली. यासाठी सरकारी दुकानातून त्यांनी बीज खरेदी केली आणि केवळ शेणखताचा वापर करीत आज सुमारे पाच एकर जमिनीत ते विविध प्रकारची भाजी घेत आहेत.

‘घरपोच भाजी पोहोचवणार!’

नौटियाल सकाळी ताजी भाजी गाडीत भरून ती भाईंदरच्या बाजारात घेऊन येतात. ताजी आणि सेंद्रिय खतापासून पिकवलेली भाजी असल्याने अवघ्या दोन ते तीन तासांत ती संपतेदेखील. लवकरच पालेभाज्यांसोबतच फ्लॉवर, वांगी, कोथिंबीर, मिरची आदींचे उत्पादन घेऊन घरपोच भाजी देण्याचाही प्रयत्न असल्याचे नौटियाल सांगतात.