येथील कोरस गृहसंकुलातील मुला-मुलींनी उन्हाळी सुटीत इमारतीच्या आवारातच कचऱ्यापासून तयार झालेले सेंद्रिय खत वापरून रोपांची लागवड केली आहे. हिरवाई जपण्याचे संस्कार मुलांवर लहानपणीच व्हावेत, हा या उपक्रमामागचा हेतू आहे.
सोसायटीच्या आवारातच कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून कोरस गृहसंकुलाने शहरातील इतर वसाहतींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे दर दोन-तीन महिन्यांनंतर इमारत आवारात सेंद्रिय खताची निर्मिती होते. याच खताचा वापर करून इमारतीच्या आवारात मुलांकरवी रोप लागवड करण्याची कल्पना कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणाऱ्या डॉ. लता घनश्यामनानी यांनी सुचवली.
संकुलातील आनंद इमारतीतील विद्या वर्दे, दीपाली चितळे आदी गृहिणींनी त्यात पुढाकार घेतला. शहरी भागात भाजीपाला, औषधी वनस्पती तसेच फुलझाडांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणाऱ्या ‘ग्रीन सोल’ संस्थेच्या प्रीती भोसले यांनी इमारतीच्या आवारातच कार्यशाळा घेऊन मुलांना रोप लागवडीबाबत मार्गदर्शन केले. सोसायटीतील तीन ते १२ वयोगटातील २५ मुलामुलींनी त्यात भाग घेतला.
सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात लागणाऱ्या पदार्थाची लागवड मुलांनी केली. त्यात मेथी, बडीशेप, ओवा, कढीपत्ता आदी भाज्या तसेच औषधी वनस्पतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सूर्यफूल, गोकर्ण, झेंडू आदी फुलझाडेही मुलांनी लावली.
पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापरून करून ठिबक सिंचन पद्धतीने या रोपांना पाणी देण्याचीही सोय करण्यात आली. या रोपांची निगा राखण्याची जबाबदारीही मुलांवर सोपविण्यात आली असून हे काम ते उत्साहाने आणि आनंदाने करीत आहेत.