भातसा नदीकिनाऱ्यावरील गावांतून युरोप, दुबईत दररोज भेंडीची निर्यात

मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतेक सर्व मोठी धरणे असूनही तीव्र पाणीटंचाई सोसणाऱ्या शहापूर तालुक्यातील काही गावांनी आता सेंद्रीय भाजीपाला लागवडीत फार मोठी कामगिरी केली असून येथील भेंडी आता जगभरात निर्यात होऊ  लागली आहे. भातसा नदीकिनारी असणाऱ्या काही गावांनी उपलब्ध सिंचनाचा वापर करून नावीन्यपूर्ण पिके घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी पावसाळ्यात पारंपरिक भात, नागलीची पिके घेतल्यानंतर तालुक्यातील बरीचशी शेती नापिकी अवस्थेत पडून राहत होती. मात्र आता रब्बी हंगामातही शेतकरी भाजीपाला लागवड करून त्यातून चांगले उत्पादन मिळवीत आहेत.

जगभरात सेंद्रीय भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेऊन अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवड सुरू केली आहे. सध्या शहापूर तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात भेंडी परदेशात निर्यात होत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अजय पाटील यांनी दिली. शहापूर तालुक्यात सध्या तब्बल
१२०० हून अधिक हेक्टर क्षेत्रात सेंद्रीय पद्धतीने भेंडीचे उत्पादन घेतले जाते. येथून दररोज सरासरी १५ ते २० टन भेंडी निर्यात केली जाते. तुते या एका गावातूनच ४० शेतकऱ्यांचा गट सेंद्रीय पद्धतीने भेंडीचे उत्पादन घेतो. गावातील सर्वच शेतकरी सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेऊ  लागले आहेत. त्यामुळे या एका गावातूनच दोन ते अडीच टन भेंडी निर्यात होते. पावसाळी भातपीक काढले की शेतकरी भेंडी लागवड करतात. साधारण जानेवारी ते मे दरम्यान भेंडीचे उत्पादन मिळते.

२५ रुपये हमीभाव

विशेष म्हणजे भेंडी परदेशात निर्यात करणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांशी करार केला आहे. त्यामुळे बाजारातील दर कितीही असला तरी या शेतकऱ्यांना २५ रुपये किलो दराने पैसे दिले जातात. शेतकऱ्यांच्या गावात येऊन ही भेंडी नेली जाते. शेतातून भेंडी काढल्यापासून परदेशातील ग्राहकापर्यंत २४ ते ४८ तासात ही भेंडी पोहोचते. निर्यात करण्यापूर्वी एकसारख्या आकाराची भेंडी वेगळी काढून खोक्यात भरली जाते. साधारण रात्री आठच्या सुमारास गावात वाहन येऊन ही भेंडी वाशी बाजारात नेली जाते. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती एकरी किमान लाख रुपयांचे उत्पन्न पडते.

फुलशेतीने तारले

काळ कितीही बदलला असला तरी अजूनही शेती हाच उदरनिर्वाहाचा उत्तम पर्याय असल्याचे शहापूर तालुक्यातील भातसई येथील प्रगतिशील शेतकरी विजय दळवी यांनी दाखवून दिले आहे. अवघी ३७ गुंठे जागा असणाऱ्या दळवींनी पत्नी पुष्पासमवेत फुलशेती केली आहे. पदवीधर झाल्यानंतर बी.एड. करून शिक्षकीपेशा पत्करायचा त्यांचा विचार होता. मात्र बी.एड.ला प्रवेश न मिळाल्याने त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. जेमतेम ३७ गुंठे जागेत तुळस, तेरडा, झेंडूची लागवड करून दळवी दाम्पत्याने स्थानिक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. खर्च वजा करून वार्षिक सहा ते सात लाख रुपये मिळविणाऱ्या दळवींचा ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे. फुलशेतीतून स्वत:च्या कुटुंबाला प्रगतीपथावर आणतानाच दळवी यांनी त्यांच्या या शेतीउद्योगात सहा आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगारही मिळवून दिला आहे. गेली काही वर्षे स्वत:च्या जागेबरोबरच शेजारील शेतजमीन भाडय़ाने घेऊन ते शेती करीत आहेत.