ख्रिश्चन, शीख आणि जैन धर्मीयांचा सहभाग; एकोपा, सामंजस्य वाढविण्यासाठी निर्णय
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या भारतीय नववर्षांचे खास पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीने स्वागत करण्याची प्रथा आता महाराष्ट्रात चांगलीच रुजली आहे. दरवर्षी नवनवे उपक्रम राबविणाऱ्या ठाण्याच्या स्वागत यात्रेत यंदा अन्य धर्मीयांनाही मोठय़ा प्रमाणात सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाण्यातील कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ख्रिश्चन, शीख, जैन धर्मीयही सहभागी होणार आहेत.
कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत यंदा मराठमोळ्या नागरिकांसोबत इतर धर्माच्या नागरिकांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. भारतामध्ये नांदणाऱ्या विविध धर्मीयांमधील एकोपा आणि सामंजस्य वाढावा, यासाठी न्यासाने हा निर्णय घेतला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी होणाऱ्या स्वागतयात्रेच्या नियोजनासाठी कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध
संस्थांचे प्रतिनिधी आणि कौपीनेश्वर न्यासचे पदाधिकारी यांनी एकत्रितपणे या निर्णयाला दुजोरा दिला, असे कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासचे विश्वस्त मा.य.गोखले यांनी सांगितले.
ठाणे शहरात गेली १५ वर्षे कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे आकर्षक देखावे, भव्य रांगोळ्या आणि सजावट पाहायला मिळते. दरवर्षी मोठय़ा संख्येने विविध संस्था या स्वागतयात्रेत सहभागी होत असतात. या वर्षी वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या माध्यमातून येऊर येथील सात आदिवासी पाडय़ांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आदिवासी पाडय़ांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून बक्षीसपात्र फलक स्वागतयात्रेत सहभागी केले जाणार आहेत. महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला सावरकरांच्या ५० व्या पुण्यस्मरणानिमित्त कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात सावरकरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
संस्कार भारती या संस्थेतर्फे पाणी विषय घेऊन गावदेवी मैदानात भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे स्वागतयात्रेतील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ७ एप्रिल रोजी स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला तलावपाळीच्या काठावर एकत्रित दिव्यांची रोषणाई करत दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करून मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवात फटाक्यांना बंदी आहे.

सोसायटी सजावट स्पर्धा
या वर्षी प्रथमच कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने सोसायटी सजावट स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. ठाणे शहरातील काही निवडक सोसायटींमध्ये केल्या जाणाऱ्या सजावटीचे परीक्षण करून उत्कृष्ट सोसायटी सजावटीसाठी पारितोषिक दिले जाणार आहे.

सेल्फी विथ स्वागतयात्रा
जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी या वर्षी सेल्फी विथ स्वागतयात्रा अशा अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वागतयात्रेत तरुणांनी सेल्फी काढून फेसबुकवर अपलोड केल्यास उत्कृष्ट सेल्फी छायाचित्राला पारितोषिक दिले जाणार आहे, अशी माहिती स्वागतयात्रा निमंत्रक मयूरेश जोशी यांनी दिली.

सावरकरांचे स्मरण
दीपोत्सवाच्या दिवशी तलावपाळीच्या काठावर मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित असतात. यावेळी देशभक्तीची गाणी, सावरकरांची गाणी गाण्यासाठी न्यास प्रयत्नशील आहे.

उत्कृष्ट वेशभूषा
स्वागतयात्रेत अनेक हौशी तरुण-तरुणी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत असतात. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी प्रथमच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा केलेल्या सहभागी तरुण-तरुणींना पारितोषिक दिले जाणार आहे.