नाशिकच्या विकासावर भिस्त; लेखीऐवजी मुलाखतींचा मार्ग

पाच वर्षांपूवी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन हवा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची परीक्षा घेण्याची हौस यंदा फिटल्याचे चित्र दिसू लागले आहे. यंदा लेखी परीक्षांना फाटा देत थेट मुलाखतींचा मार्ग स्वीकारण्यात आला असून कल्याण-डोंबिवलीतील १२२ प्रभागांमध्ये पक्षाला उमेदवारही मिळणेही कठीण झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

शिवसेनेसोबत फारकत घेऊन राज ठाकरे यांनी २००७ मध्ये नव्या पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या दोन वर्षांत कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेने प्रमुख पक्षांपुढे मोठे आव्हान उभे केले. शिवसेना-भाजप युतीत लढत असतानाही मनसेने २८ जागांवर विजय मिळवून प्रमुख पक्षांच्या तोंडचे पाणी पळवले होते. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपप्रमाणे तेव्हा डोंबिवली शहर मनसेमय झाल्याचे चित्र होते. भाजपच्या डोंबिवलीतील परंपरागत मतदारसंघांना धडक देत मनसेने युतीची गणिते बिघडवली होती. या निवडणुकांना सामोरे जात असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या परीक्षा घेण्याचा निणय जाहीर केला होता. कल्याण-डोंबिवलीतील जनता सुशिक्षित आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे अभ्यासू उमेदवार पुढे केले जातील आणि त्यामुळेच लेखी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल, असे राज यांनी जाहीर केले होते. राज यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला कल्याण-डोंबिवलीतील सुजाण मतदारांनी चांगली दाद दिली होती. यंदा मात्र शहरातून मनसेची हवा ओसरल्याचे चित्र दिसू लागले असून उमदेवार मिळवताना उभ्या राहणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पक्षाने लेखी परीक्षांचा मोह आवरता घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे.

उमेदवार मिळेना

मनसेतील इच्छुकांच्या मुलाखती ३ व ४ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. ही मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रत्येक प्रभागातून पक्षातील चार ते पाच जण इच्छुक असल्याचा दावा वरिष्ठ पदाधिकारी करत असले तरी सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान यंदा पक्षाला पेलावे लागत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले. यंदा इच्छुकांकडून त्यांची माहिती मागविण्यात आली असून त्यांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे.