जयेश सामंत

शहरातील खासगी कोव्हिड रुग्णालयांमध्ये यापुढे महापालिका हद्दीबाहेरील रुग्णांना दाखल केले जाणार नाही, असा अजब फतवा ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काढला आहे. त्यामुळे ठाणे शहराला लागूनच परंतु महापालिका हद्दीबाहेर असलेल्या रुग्णांपुढील पेच वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठाणे शहराचे मूळ रहिवासी असलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रवींद्र फाटक यांनी करोनाच्या उपचारासाठी मुंबई महापालिका हद्दीतील मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयाचा पर्याय निवडला होता. असे असताना ठाणे महापालिकेने शहराबाहेरील रुग्णांना करोना उपचारासाठी केलेली ही प्रवेश बंदी वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्य सरकारने करोनाच्या उपचारासाठी त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था उभारण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून करोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. ठाणे शहरात महापालिकेचे कळवा येथील रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ठाणे शहर तसेच शहरास लागूनच असलेल्या ग्रामीण, शहरी भागातील रुग्णही उपचारासाठी दाखल होत आहेत. याशिवाय ठाणे महापालिकेने शहरातील आठ खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड कक्ष सुरू केले आहेत. याठिकाणी ९०० पेक्षा अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी काही रुग्णालयांमध्ये वाढीव बिलांची आकारणी होत असल्याची ओरड मध्यंतरी केली जात होती. दरम्यान, पुरेशा प्रयत्नांनंतरही शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आवश्यक खाटांची व्यवस्था असावी यासाठी नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील आठ खासगी कोव्हिड रुग्णालयांमध्ये यापुढे केवळ ठाणे शहरातील नागरिकांनाच दाखल केले जाणार असून या सर्व खाटा ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ भागातील रहिवाशांसाठीच आरक्षित असाव्यात, असे फर्मान आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहे. ठाणे महापालिका हद्दीतील रहिवासी करोना उपचारापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय घेत असल्याचे समर्थन आयुक्तांनी आदेश काढताना केले आहे.

ठाणे महापालिका हद्दीस लागून असलेल्या ग्रामीण, अर्धनागरी परिसरातून मोठय़ा संख्येने रुग्ण ठाणे शहरात कोव्हिड उपचारासाठी येत असतात. त्यांना ही प्रवेश बंदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील काही बडय़ा नेत्यांनी करोनावरील उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे ठाणे महापालिका असा निर्णय कसा घेऊ शकते, असा प्रश्न विचारला जातो.

ठाणे महापालिकेने ठाणेकरांना पुरेशी आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी याचा विचार करायला हवा. मात्र आरोग्य सेवा पुरविताना केवळ आमच्या शहरातील रुग्णांवरच उपचार करू हा संकुचित विचार या काळात धक्कादायक म्हणावा लागेल. मुलुंड येथील एका वृद्धाश्रमातील करोनाबाधित ज्येष्ठ नागरिकांना ते केवळ हद्दीबाहेरील रहिवासी आहेत असे सांगून ठाण्यातील कोव्हिड रुग्णालयात प्रवेश नाकारण्याचा प्रकारही यापूर्वी उघडकीस आला होता.

– संजय केळकर, आमदार ठाणे