राज्यातील मासेटंचाईमुळे कर्नाटक, कोलकता, आंध्रहून मासळीची आवक; मागणीमुळे दरातही वाढ

पावसाळ्यात महाराष्ट्रातील मासेमारी बंद झाल्याने मत्स्यप्रेमींचा हिरमोड होऊ लागला असतानाच खवय्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या बाजारात आंध प्रदेश, कोलकता, कर्नाटक, ओरिसा, गुजरात यासारख्या राज्यांमधून मोठय़ा प्रमाणावर माशांची आवक होऊ लागली आहे. ठाण्याच्या बाजारात विशेषत ओरिसातून माशांची आवक होत असून पापलेट, सुरमई, रावस यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जून ते ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत परराज्यातून दररोज दहा ते पंधरा ट्रक मुंबईत दाखल होत असतात. दर दिवशी १५० ते २०० टन माशांची आवक मुंबईच्या बाजारात होते आणि पुढे दादर, परळ, ठाण्याच्या बाजारात मासळी विक्रीला आणली जाते. परराज्यातून येणारे मासे चवीला उत्तम असले तरी दर गगनाला भिडल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहे. ओरिसा, कर्नाटक, कोलकता यासारख्या राज्यातून मुंबई, ठाण्यात प्रामुख्याने पापलेट (२५०० रुपये), रावस ( १००० रुपये), सुरमई (९०० रुपये) अशा माशांची आवक होत आहे.

पारंपरिक मत्स्यशेतीचा काळ

मोठय़ा माशांप्रमाणे कोलंबी, बोंबील, मांदेली या लहान माशांना देखील मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने या माशांसाठी ठाणे खाडी ठिकाणी मत्स्यशेती केली जाते. प्रवाहाबरोबर वाहणारी जाळी आणि स्टँण्ड बाय म्हणजेच एकाच जागी जाळी लावून कोलंबी, बोंबील, मांदेली या माशांची शेती केली जाते. पाचशे ते सहाशे रुपये किलोपर्यंत लहान मासे ठाणे, मुंबईच्या बाजारात विकले जातात, असे ठाण्यातील मासळी विक्रेते भावेश कोळी यांनी सांगितले.

शिळ्या माशांना ऊत

पावसाळ्याच्या तोंडावर विक्रेत्यांकडून दोन महिने अगोदरपासून शिळे मासे बर्फात साठवून ते विक्रीसाठी काढले जातात. मासेमारी बंद होताच काही दिवसांनी ते विक्रीसाठी काढून अवाच्या सव्वा दराने विकले जात असल्याचे काही लहान मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. माशांची पारख नसलेल्या ग्राहकांच्या गळ्यात असे मासे मारले जातात. त्यामुळे बाजारात सध्या शिळ्या माशांना ऊत आला असून त्यांचीही चढय़ा दराने विक्री सुरू आहे.

कोलकत्याचे पापलेट विशेष चवदार

पावसाळ्यात मुंबईतील पारंपरिक मासेमारी सुरू असली, तरी समुद्रातील खोल पाण्यातील माशांची उपलब्धता नसते. यासाठी परराज्यातून मोठय़ा माशांची आवक मुंबईच्या बाजारात होत असते. विशेष म्हणजे कोलकत्याचे पापलेट चवीला उत्तम असल्याने या माशांना अधिक मागणी असते. उत्कृष्ट दर्जाचे सुपर पापलेट २२०० ते २५०० रुपये किलोपर्यंत विकले जातात, असे उरण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष जयवंत कोळी यांनी सांगितले.