गैरव्यवहार झाल्याचा भाजपचा आरोप

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी खरेदी केलेल्या विविध साहित्यांच्या मंजुरीचे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असले तरी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केल्याने ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. खरेदी करण्यात आलेल्या काही साहित्यासाठी एकाच ठेकेदाराने दोन वेगवेगळे दर लावले असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. सभेपूर्वी महापालिका प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावत पारदर्शकपणे साहित्याची खरेदी झाल्याचा दावा केला.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने शहरात अलगीकरण कक्षाची उभारणी केली. या कक्षासाठी २७ हजार उशांचे कव्हर, २१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल, १८ हजार रुमाल, १४ हजार बादल्या, ३ हजार कच ऱ्याचे सूप, १ हजार डासनाशक यंत्रे, १ हजार कंगव्यांबरोबरच २ हजार बॉलपेन अशा साहित्यांची खरेदी केली. विलगीकरण कक्षात या साहित्याची गरज असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी अवाच्यासव्वा दराने या वस्तूंची खरेदी केली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेला वाकुल्या दाखवत या वस्तूंच्या खरेदीत मनमानी पद्धतीने भाव आकारणी झाली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. करोना आपत्तीत खर्च अफाट केला. एक उशीर्ची किंमत ३३५ रुपये ठरविण्यात आली. शिवाय चादर २७७ रुपये, सोलापूर चादर ३७५ रुपये, सतरंजी ३७५ रुपये, मोठा टॉवेल १९४ रुपये , रुमाल  ५९ रुपये, उशीचे कव्हर ५१ रुपये, प्लास्टिक स्टूल ४४९ रुपये, मोठी बादली ३७८ रुपये, छोटी बादली ९१ रुपये, कंगवा १८ रुपये या दराने साहित्य खरेदी करण्यात आली आहे.  मार्चच्या तिस ऱ्या आठवड्यातच १ कोटी २९ लाखांची खरेदी झाली. त्यानंतर कालांतराने वेळोवेळी वस्तूंची खरेदी झाली. सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचा प्रस्ताव आता दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय नगरसेवक पवार यांनी व्यक्त केला. तसेच संबंधित वस्तूंचा दर्जा आणि वस्तू विकत घेतल्या होत्या का, याची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

खुर्च्यांसाठी नऊ लाख

अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १५ हजारांची खुर्ची खरेदी केली असून त्यासाठी नऊ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोन लाखांचे १६ टेबल खरेदी करण्यात आले आहेत. याशिवाय, अन्नपुरवठा, मृतदेहांची वाहतूक, कचरा वाहतूक याचीही कोट्यवधींची बिले अदा झाली आहेत. दहा लाखांचे दुय्यम दर्जाचे सॅनिटायझर खरेदी करण्यात आले आहे. तसेच पीपीई किट आणि मास्क जास्त दराने खरेदी करण्यात आले आहेत. तसेच खाटा आणि गाद्यांसाठी एक कंत्राटदार असून त्याने वेगवेगळे दर लावले आहेत. तर रुग्णांना कंगवे, कर्मचाऱ्यांसाठी पेन खरेदी म्हणजे केवळ पैसे हडपण्याचे निमित्त होते, असा गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

करोना आपत्ती काळात आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी अत्यंत पारदर्शकपणे झाली आहे. बाजार भावातील दरांशी तुलना करूनच ही खरेदी केली आहे. त्यात काहीच गैर झालेले नाही.

 – डॉ. राजू मुरुडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका