सावंडे-गोरसाई मार्ग पाच महिन्यांत सज्ज; भिवंडीसह घोडबंदर, फाऊंटन नाक्यावरील कोंडीही टळणार

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : भिवंडी शहरातून मुंबई-नाशिक महामार्गाकडे होणाऱ्या अवजड वाहनांमुळे शहरात विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सावंडे-गोरसाई मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या रस्त्याचे काम येत्या चार ते पाच महिन्यांत पूर्ण होणार असून त्यानंतर भिवंडी-वाडा मार्गावरून होणारी अवजड वाहतूक नव्या रस्त्यावरून शहराबाहेरून मार्गस्थ होऊ शकेल. यामुळे भिवंडी शहरातील अवजड वाहतुकीचा ताण कमी होईलच; पण त्यासोबतच घोडबंदर रस्ता आणि फाऊंटन नाका येथे होणारी कोंडीही कमी होईल.

भिवंडी-वाडा मार्गे मुंबई-नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने भिवंडी शहरातून वाहतूक करतात. मात्र, भिवंडीत रस्त्यांची, उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने रस्ते अरुंद बनले आहेत. त्यातच अवजड वाहनांचा भार वाढून शहरातील वाहतूक स्थिती बिकट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सावंडे-गोरसाई मार्गाची बांधणी दिलासादायक ठरणार आहे. सावंडे-गोरसाई रस्ता तयार करण्याची योजना पाच वर्षांपासून प्रस्तावित होती. मात्र, या ना त्या कारणाने हे काम रखडले होते. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नव्याने निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर अवघ्या चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भिवंडी शहरातील अवजड वाहतूक कोंडी टळणार आहे. काही वाहने भिवंडी-वाडा येथील मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घोडबंदर मार्गे माजिवडा येथून मुंबई-नाशिक महामार्गावरून जात असतात. त्यामुळे हा पर्यायी मार्ग झाल्यास फाऊंटन, वर्सोवा आणि घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा भारही कमी होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या नव्या रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती. हा रस्ता झाल्यास ठाणे, भिवंडी शहरातील अवजड वाहतुकीचा भार कमी होणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होईल.

– बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

रस्ता रखडण्याचे कारण..

या रस्त्याच्या कामाचा ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला होता. या ठेकेदाराने कामोरी नदीवर पूल बांधणीचे काम सुरू केले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ठेकेदाराने हे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम पाच वर्षांपासून रखडले आहे.

‘बावळण’ मार्ग असा..

भिवंडी-वाडा मार्गे येणारी वाहने विश्वभारती फाटा मार्गे उजवीकडे वळण घेऊन सावंडे-गोरसाई रस्ते मार्गे जातील. त्यानंतर ही वाहने कोमोरी नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलावरून थेट भिनार येथे जातील. तेथून पुढे ही वाहने थेट मुंबई नाशिक महामार्गे जातील. चार किलोमीटरचे हे अंतर आहे.