तातडीने सव्‍‌र्हेक्षणाचे आदेश; ठाणे महापालिका आयुक्तांनी जाहीर केली रुग्णालयांची यादी

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील काही खासगी रुग्णालयांमध्ये तातडीने ताप सर्वेक्षण बाह्य़रुग्ण कक्ष तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनास दिले आहेत. रुग्णांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्यांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांची यादी त्यांनी जाहीर केली आहे.

वर्गीकरण एकमध्ये गेल्या २८ दिवसांत परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालय, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कौशल्या मेडिकल फाऊंडेशन, ज्युपीटर, होरायजन, बेथनी, जितो, वेदांत, रेहमानीया, काळसेकर येथे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्गीकरण दोन मध्ये परदेशात प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी आणि वर्गीकरण तीनमध्ये कफ, घसादुखी, थंडी वाजणे अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची खासगी रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कौशल्या मेडिकल फाऊंडेशन, क्रीटीकेअर, ठाणे हेल्थ केअर, ज्युपिटर, रेहमानीया, बेथनी, मेट्रोपोल, सिद्धिविनायक, वेदांत, हायलॅण्ड सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटल, जितो, काळसेकर, कोपरी हेल्थ सेंटर, शिवाजीनगर हेल्थ सेंटर, आयुर्वेदिक डिस्पेन्सरी, मानपाडा हेल्थ सेंटर, शिळ हेल्थ सेंटर, लोकमान्य कोरस हेल्थ सेंटर, रोझा गार्डनिया, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुगणालये येथे तपासणी होईल.

संशयित रुग्णांची यादी पालिकेला पाठवा

करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरू  असून खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा अशा तक्रारी असतील तर त्यांना स्वतंत्र बाह्य़रुग्ण कक्षात तपासणीसाठी किमान एक ते दीड मीटर अंतरावरून तपासणी करावी. तसेच करोना संशयित रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी महापालिकेमार्फत खासगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचा संशय आला तर अशा रुग्णांना तपासणीसाठी शासनमान्य तपासणी केंद्राकडे किंवा मान्यताप्राप्त  प्रयोग शाळेकडे पाठवावे. तपासणी केलेल्या रुग्णांपैकी करोना संशयित किंवा बाधित रुग्णांची यादी  महापालिकेच्या tmchqncov2019@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याबाबतच्या सूचना महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना केल्या आहेत.