News Flash

टाळेबंदीचा ताप!

ठाण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांत संताप

टाळेबंदी असताना भाजीखरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी शिक्षा म्हणून भररस्त्यात बसवून ठेवले. (छायाचित्र: दीपक जोशी)

ठाण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांत संताप

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, असे आश्वासन आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले असतानाही महापालिकेचे अधिकारी अनेक भागांतील दुकाने बळजबरीने बंद करत आहेत.   यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

ठाणे महापालिकेने २ ते १२ जुलैपर्यंत टाळेबंदीचे आदेश काढले होते. या आदेशामध्ये जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी सुरू राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र, जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार की नाही, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण या आदेशात नव्हते. त्यामुळे गेल्या दोन आठवडय़ांपासून शहरातील सर्व किराणा, भाजीपाल्याची दुकाने आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यातच या टाळेबंदीला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी  जीवनावश्यक वस्तूंची दुकाने शासनाने दिलेल्या नियमानुसार सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद केली जात आहेत.

महापालिकेच्या या टाळेबंदीमुळे नागरिकांना अनेक ठिकाणी चढय़ा दराने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. १२ जुलैनंतर टाळेबंदी शिथिल होऊन दुकाने सुरू होतील, या आशेवर ठाणेकरांनी मागील दहा दिवस ढकलले. मात्र, आता पुन्हा आठवडाभर दुकाने बंद राहणार असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

पोलिसांमध्येही संभ्रम

टाळेबंदीचे आदेश महापालिका प्रशासन काढते मात्र या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांमार्फत केली जाते. महापालिकेकडून जीवनावश्यक वस्तू सुरू ठेवायच्या की नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने अनेकदा भाजीविक्रेते किंवा किराणा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी लागते. महापालिकेचे एकही अधिकारी पोलिसांसोबत फिरत नाहीत अशाही तक्रारी पोलीस दलात आहेत. सगळीकडे कडेकोट बंद करा अशा सूचना पोलिसांना येतात. मात्र, शासनाच्या आदेशात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. त्यानंतरही ही दुकाने बंद करा, असा दबाव पोलिसांवर येत असल्याच्या तक्रारी आहेत.

टाळेबंदीमध्ये धान्याच्या विक्रीसाठी सकाळी ९ ते ११ ही वेळ पालिकेने आयुक्तांच्या निर्णयानुसार ठरविली आहे. त्यानुसार किराणा वस्तूंची विक्री सुरू असते.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:50 am

Web Title: outrage among citizens over closure of essentials shops in thane zws 70
Next Stories
1 व्यापारीवर्गाचीही घुसमट!
2 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या हाती अभ्यासाच्या प्रती
3 ठाणे पालिकेची शून्य कोविड मोहीम
Just Now!
X