ठाण्यात २० दिवसांत ३० प्राण्यांचा मृत्यू; दीडशेपेक्षा अधिक श्वान, मांजरांचा अपघात

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची संख्या पुन्हा वाढली असून या वाहनांची धडक बसून ठाणे आणि मुलुंड भागांत दीडशेपेक्षा अधिक भटके श्वान आणि मांजरांचा अपघात झाला आहे. टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ कमी झाल्याने भटक्या प्राण्यांचा वावर अधिक मोकळेपणे सुरू होता. दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर अचानक वाढीस लागलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे प्राणी गोंधळू लागले असून यामुळे हे अपघात घडत आहेत, असे प्राणितज्ज्ञांचे मत आहे. मागील २० दिवसांत ३० प्राण्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरासरी आठ ते दहा प्राणी दिवसाला वाहन अपघातात जखमी होत आहेत. हे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक आहे, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे. चालकांकडून भरधाव वाहने चालविण्यात येत असल्याने अपघात वाढले असल्याचे प्राणिमित्र संघटनांचे म्हणणे आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत रस्त्यावर वाहने नसल्याने अनेक भटके श्वान, मांजरी, गाई रस्त्यावर मोकळेपणे वावर करत होत्या. रस्त्यावर वाहने नसल्याने भटके प्राणी रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याकडेला फिरताना किंवा झोपत असल्याचे पाहायला मिळत होते. ३ जूनपासून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर खासगी कंपनीत काम करणारे किंवा कामानिमित्ताने बाहेर जाणारे अनेक जण रस्त्यावर वाहने घेऊन बाहेर पडू लागले आहेत. यातील अनेक जण भरधाव वाहने चालवत आहे. भरधाव वाहनांमुळे ३ ते २२ जून या कालावधीत ठाणे आणि मुलुंड शहरात १५० श्वान आणि मांजरांचा रस्ते अपघात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे अपघात मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गावरही झालेले आहेत. या अपघातात प्राण्यांच्या पायाला, डोक्याला तसेच कमरेकडील भागात मार लागत असल्याची माहिती सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या प्राणिमित्र संघटनेने दिली.

अपघातात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १५० पैकी ३० प्राण्यांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे, तर गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांना अपंगत्वही येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे आणि मुलुंडमध्ये प्राण्यांच्या रस्ते अपघातात जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. संस्थेतील पदाधिकाऱ्यांना प्राण्यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ अपघातस्थळावर जाऊन प्राण्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत असतो. नागरिकांनी वाहने चालवताना भान ठेवावे. समजा, चुकून प्राण्याचा अपघात घडल्यास घटनास्थळावरून पळून न जाता त्या प्राण्याचा जीव वाचविण्यास मदत करावी.

– प्रणव त्रिवेदी, सदस्य, सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन