पाच महिन्यांच्या कालावधीत अडीच लाख नागरिकांच्या पदरी निराशा

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. असे असले तरी मुंबई महानगर क्षेत्राबाहेर जाण्यासाठी ई-पास काढू पाहाणाऱ्या अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव, वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यांमुळे चार महिन्यांत अडीच लाखांहून अधिक नागरिकांचे अर्ज पोलिसांनी नामंजूर केले आहेत. एक लाख ३३ हजार ७५९ नागरिकांना ही सवलत प्राप्त झाली असून या प्रक्रियेत अडकून पडलेल्या अनेकांना छुप्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

ई-पासच्या मंजुरीसाठी ‘कोविड १९’ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज केल्यानंतर संबंधित विभागातील पोलिसांकडून तो अर्ज मंजूर केला जातो. ठाणे शहर पोलीस दलाला ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या भागांतून २३ मार्च ते २५ ऑगस्ट या कालावधीत ४ लाख ६७ हजार ४२८ ई-पास अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी केवळ १ लाख ३३ हजार ७५९ अर्ज पोलिसांनी मंजूर केले. २ लाख ८२ हजार २२४ ई-पास नामंजूर करण्यात आले, तर ५१ हजार ४४५ अर्ज अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपुरी कागदपत्रे, अपूर्ण माहिती आणि प्रवासासाठी दिली जाणारी अयोग्य कारणे यांमुळे ई-पास नामंजूर होतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाणे शहरात सर्वाधिक अर्ज अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली.

गणेशोत्सव सुरू झाल्याने ऑगस्ट महिन्यात कोकणात किंवा रायगड जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात अर्ज केले होते. त्यामुळे १ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत पोलिसांना ६१ हजार ७३६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १९ हजार ६६९ अर्ज पोलिसांनी मंजूर केले. तर ३४ हजार २८५ अर्ज नामंजूर करण्यात आले. ७ हजार ७८२ अर्ज अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ई-पास नामंजूर होण्याचे प्रमाण अधिक असल्याने गणेशोत्सवासाठी कोकण किंवा रायगडमध्ये जाणाऱ्या अनेकांना ई-पास न काढता रात्री पोलीस बंदोबस्त कमी असताना गावाच्या दिशेने प्रयाण केल्याची माहिती आहे, तर एसटीने प्रवास केल्यास ई-पासची गरज नसल्याने आता अनेकांनी एसटीचा आधार घेतला.

शहरनिहाय ई-पास मंजुरी

शहर                                 मंजूर              नामंजूर                     प्रतीक्षेत

ठाणे                               ३६,१८७                 ८२,७७३                    ५१,३५५

भिवंडी                             ८,९७४                    २०,५२९                     १३

कल्याण-डोंबिवली             ६०,६४८            १,४१,३९७                     ४७

उल्हासनगर ते बदलापूर     २७,९५०              ३७,५२५                     ३०

एकूण                           १,३३,७५९               २,८२,२२४                  ५१,४४५