गुन्हे दाखल होऊनही पोलिसांकडून सौम्य भूमिका घेण्यात येत असल्याचा परिणाम

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. करोना प्रतिबंधासाठी शासन, पालिका प्रशासनाने विविध प्रकारचे कठोर निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनी जमावबंदी, संचारबंदी कायदे लागू करून अनावश्यक संचाराला प्रतिबंध केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना मज्जाव केला आहे. असे कठोर निर्बंध असताना कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये अनेक मंडळी करोना संसर्गाचा विचार न करता गर्दी जमवून हळदी, विवाह सोहळे, खिल्लार बैलांचे वाढदिवसांचे कार्यक्रम करत असल्यामुळे पोलीस हैराण झाले आहेत.

शहरातील बहुतांशी रहिवासी कायद्याचे पालन करून करोना प्रतिबंधासाठी प्रयत्नशील असताना मूठभर मंडळी बेशिस्तपणे वागून करोना प्रसाराला हातभार लावत आहेत, अशी टीका कल्याण, डोंबिवलीत सुरू झाली आहे. हे सोहळे आयोजित करताना पालिका, पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. याउलट गर्दी जमवून करोनाचा प्रसार होईल अशी व्यवस्था करतात. कार्यक्रमात सहभागी एकाही वऱ्हाडी, उत्सवी व्यक्तीच्या तोंडावर मुखपट्टी नसते. मंडपाच्या प्रवेशद्वारात जंतुनाशक हातधुणी नसते. अंतरसोवळ्याचे कोणतेही पालन केले जात नाही, अशा तक्रारी पुढे येत आहेत. मागील वर्षी डोंबिवलीत मढवी बंगल्याजवळ हळदी सोहळा झाला होता. त्यात एक तरुण तुर्कस्तानातून प्रवास करून येऊन सहभागी झाला होता. या तरुणाला नंतरच्या पाच ते सहा दिवसांत करोनाची बाधा झाली. त्यानंतर अनेक लोकांना करोनाची बाधा झाली होती. डोंबिवलीत असाच एक विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी झाला. यातील वऱ्हाडी नंतर करोनाबाधित झाले. राजाजी रस्ता भागात एका विवाहानंतर भोजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला त्या सोसायटीतील काही जण करोनाबाधित होते. तो संसर्ग या कार्यक्रमाला आलेल्या मंडळींना मग झाला, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.

आयोजकांची बेफिकिरी

दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत मोठागावमध्ये हौशी तरुणांनी बैलाचा वाढदिवस साजरा केला होता. त्या कार्यक्रमाची दृश्यचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विवाह सोहळ्याला ५० जणांची उपस्थिती बंधनकारक आहे हे माहिती असूनही गेल्या महिन्यात कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील राजेश यशवंत म्हात्रे यांच्या मुलीचा विवाह ठाणे कासारवडवली येथील महेश राऊत यांच्या मुलाबरोबर झाला. या समारंभात ७०० हून अधिक वऱ्हाडी मुखपट्टी, करोना संसर्गाचे नियम धुडकावून सहभागी झाले होते. त्यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे माहिती असूनही दोन दिवसांपूर्वी चिंचपाडा गावातील प्रकाश म्हात्रे आणि वैभव प्रकाश म्हात्रे यांनी हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री आयोजित केला. संचारबंदीचे उल्लंघन करून गर्दी जमविली. या सोहळ्यात वऱ्हाडींबरोबर आपले लाडके खिल्लारी बैलही नाचविले. त्यांच्यावरही विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

करोना महामारी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहेत. अशा वेळी हळदी, विवाह समारंभात गर्दी जमवून बैल नाचविण्याचे प्रकार अशोभनीय आहेत. हे विघातक प्रवृत्तीचे प्रदर्शन आहे. अशी प्रवृत्ती पोलिसांनी कठोर कारवाई करूनच थांबवली पाहिजे. तरच इतर आयोजकांना एक चांगला संदेश जाईल. समाजातील ज्येष्ठ, जाणकार मंडळींनी अशांना उपदेशाचे बोल सुनावले पाहिजेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. 

– गुलाब वझे, अध्यक्ष, आगरी युथ फोरम

करोनाचा कहर आता ग्रामीण भागात पसरत आहे. उपचाराच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. हे विचारात घेऊन विवाह, हळदी, वाढदिवस करणाऱ्या आयोजकांनी सोहळे पुढे ढकलावेत. अगदी गरज असेल २५ जणांच्या घरगुती सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडावा. अनेक व्यायामशाळा गुपचूप सुरू आहेत. त्यांनी तरुणांच्या जिवाशी खेळू नये. पोलिसांनी कठोर होऊन नियमबाह्य़ वागणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

चंद्रकांत पाटील, सरचिटणीस संघर्ष समिती, २७ गावे