रिक्षाचालकांच्या मुजोरीपुढे प्रशासन ढिम्म; वसईकरांचा जीव धोक्यात

रिक्षामध्ये नियमानुसार केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षातून नेतात. वसई-विरारमध्ये तर तब्बल पाच प्रवासी एका रिक्षातून प्रवास करतात आणि प्रशासन मात्र त्याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षातून नेत असल्याने वसईकरांचा जीवही धोक्यात आला आहे.

वसई-विरार शहरात चालणाऱ्या रिक्षांना मीटर नसल्याने प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली होत असते, त्यातच आता रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा असतानाही कधी चार, तर कधी पाच प्रवासी रिक्षातून नेत असल्याचे चित्र आहे. नायगाव पूर्व, नायगाव पश्चिम, नालासोपारा पूर्व या ठिकाणी तर पाच  प्रवासी बसवले जातात. तीन प्रवासी मागील आसनावर तर दोन प्रवासी रिक्षाचालकाच्या आजुबाजूला बसविण्यात येतात. मात्र वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नाही. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्षात बसलेल्या प्रवाशांचा जीव सतत टांगणीला असतो. मुख्य रस्त्यांवरही सर्रास चार प्रवासी बसवले जातात.

प्रवाशांचे हाल

अनेक ठिकाणी तर पाच प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षा सुरूच होत नाही. शेअर रिक्षाचे भाडे प्रति प्रवासी ८ ते १० रुपये असते. त्यामुळे रिक्षाचालकाला एका फेरीमागे ५० रुपये मिळतात. रिक्षात बसलेल्या प्रवाशांना दाटीवाटीने आणि आखडून बसावे लागते. महिला प्रवाशांचे यात खूप हाल होतात.

कारवाई नाही

एकीकडे मीटर लावणे बंधनकारक असताना वसई-विरार शहरात कुठल्याची रिक्षांना मीटर लावण्यात आलेले नाहीत. त्यातच ही बेकायदा वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलीस इतर वाहनांवर कारवाई करतात. मात्र बेकायदा प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाही.

मनमानी कायम

मीटर नसल्याने रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. विशेष रिक्षा करून जायचे असल्यास २५ ते ३० रुपये भाडे द्यावे लागते. त्यामुळे लोकांना नाइलाजाने शेअर रिक्षात बसावे लागते. आम्ही शेअर रिक्षात बसतो पण चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा सुरू करत नाही. दुपारच्या वेळी खूप वेळ वाट बघावी लागते, असे सरला पाटील या वसईतील महिला प्रवाशांनी सांगितले.