नववर्ष स्वागतासाठी रात्रभर पाटर्य़ा

ठाणे : येऊरमधील वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत असल्याचे कारण पुढे करत वनविभागाने पर्यटकांना रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान प्रवेश करण्यास बंदी घातली होती. मात्र, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी वनविभागाचे सुरक्षारक्षकच पर्यटकांच्या वाहनांना येऊरचे दरवाजे खुले करून देत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

येऊरमधील पर्यटकांच्या वर्दळीमुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने वनप्रशासनाकडून  प्रवेशाबाबतचे नियम कडक केले होते. वनपरिक्षेत्रात सकाळी ५ ते ८ या वेळेत प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकडे मासिक पास असला तरच येऊरमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत स्थानिकांखेरीज अन्य व्यक्तीला येऊरमध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचा नवा नियमदेखील लागू करण्यात आला होता.  त्याची काटेकोर अंमलबजावणी होत होती. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री प्रशासनानेच या नियमांना हरताळ फासला.

नववर्ष पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतरही येऊरच्या प्रवेशद्वारातून वनाधिकाऱ्यांच्या समोरून वाहने जात होती. त्यामुळे पूर्वसंध्येच्या पाटर्य़ासाठी केवळ बंदीचा नियम शिथिल केल्याचे दिसून आले आहे.

येऊर प्रवेशबंदीचा नियम लागू असून गावकऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत येऊरमध्ये प्रवेश दिला जात नाही. नववर्ष पूर्वसंध्येलाही कोणत्याही व्यक्तीला ११ वाजेनंतर येऊरमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही.

– राजेंद्र पवार, येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी