ब्राऊन आऊल हे नावाप्रमाणेच ब्राऊन रंगाचे, हेस्पिरिडे कुळातील एक लहान फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखांची वरची बाजू ही गडद तपकिरी रंगाची असते. नर फुलपाखरांच्या पुढच्या पंखांवर वरच्या टोकाला पिवळसर अर्धपारदर्शक असे तीन ठिपके असतात. मादी फुलपाखरांमध्ये मात्र हे ठिपके नसतात. एवढा फरक सोडला तर नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. नर आणि मादी यातील फरक पटकन कळत नाही. या फुलपाखरांच्या पंखांची खालची बाजू फिक्कट रंगाची असते.
याचे मुख्य कारण म्हणजे ब्राऊन आऊल फुलपाखरांचे वास्तव्य निमहरित पानझडी जंगलांमध्ये असते. इथे जमिनीवर पडलेल्या पानांच्या किंवा मातीच्या रंगात यांचा रंग बेमालूम मिसळतो आणि ती पटकन दिसत नाहीत. ही फुलपाखरे मुळची दक्षिण भारतातील असली तरी संपूर्ण भारतीय उपखंड, म्यानमार तसेच ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रदेशात सापडतात. हा सर्व प्रदेश मोसमी पावसाचा प्रदेश आहे. पावसाळ्यात ही फुलपाखरे निमहरित जंगलांमधून बाहेर पडून पानगळीच्या जंगलांकडे वळतात. या फुलपाखरांना जंगलात मध्यभागी असणारे मोकळे पट्टे, जंगलालगतची मोकळी माळराने फार आवडतात. जमिनीच्या पाच ते सहा फूट उंचीपासून पन्नास ते साठ फुटांच्या उंचीपर्यंत उडतात. दुपारी किंवा विश्रांती घेताना ही पानाच्या मागच्या बाजूस आणि खाली डोके वर पंख अशा स्थितीत बसायला आवडते. बाणाच्या टोकाचा भास व्हावा असे हे फुलपाखरू आपल्या पंखांचा कोन करतात. मादी फुलपाखरू हिरडा, बेहडा, पिलूकी अशा झाडांच्या कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची आणि फिक्कट हिरव्या रंगाची असतात. यातून बाहेर येणारे सुरवंट पिवळसर रंगावर काळ्या रेषा असणारे असतात. हे सुरवंट अंडय़ांमधून बाहेर आल्या आल्याच पान स्वत:भोवती गुंडाळून, रेशमी धाग्याने बांधून स्वत:साठी संरक्षक कवच तयार करतात. कोष विणण्यासाठी ते झाडाच्या बुंध्याजवळची सुरक्षित जागा शोधतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2016 1:47 am