कल्याण-डोंबिवली परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. शेकडो वर्षांची असलेली जुनी झाडे भुईसपाट केली जात आहेत. या झाडांचे सोबती म्हणून वावरणारे रानपक्षी हक्काचा निवारा जमीनदोस्त झाल्यामुळे बेघर होत आहेत. हे बेघर झालेले पक्षी आता झाडांचा, त्यावरील ढोलींचा (झाडाला असलेली नैसर्गिक पोकळी) निवारा नसल्याने इमारतींच्या कोपऱ्यांचे आधार घेत जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे..डोंबिवली परिसरातील एक घुबड हक्काचा निवारा गेल्याने इमारतींचे कोपरे, गच्चीचा आधार घेत दिवस काढत आहे.  
घुबडाची भ्रमंती
डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील विजयनगर सोसायटी भागात अनेक ठिकाणी मोठी झाडे आहेत. या झाडांच्या आसऱ्याला एक घुबड घरांच्या शोधासाठी दररोज येते. चांगला निवारा मिळाला म्हणून घुबड रात्रभर झाडावर निवारा करते. घुबडाला दिवसा दिसत नाही. त्यामुळे ते त्याच परिसरातील इमारतींचे कोपरे, झाडांवर वस्ती करतात. काहीवेळा घुबडाची ही वस्ती त्या झाडावर कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या कावळ्यांना खटकते. ते चोचीने त्यांना टोचून हुसकावण्याचा प्रयत्न करतात. निपचित पडलेले घुबड तात्पुरते स्व संरक्षणासाठी प्रतिकार करते. सूर्यास्त होताच दिसायला लागल्याने हे घुबड आपल्या दुसऱ्या निवाऱ्यासाठी, कावळ्याच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी उड्डाण करते. बेघर झालेल्या या घुबडाच्या या भागात रात्रीच्या वेळेत वस्तीसाठी नियमित येरझऱ्या सुरू असतात. घुबडाचे रात्रीच्या वेळेत झाडावर आगमन झाले की, कावळे तेवढय़ा वेळेत प्रचंड कावकाव करून घुबडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरा निवारा नसल्याने घुबड हटायला तयार नसते, असे या भागातील रहिवासी देवाशिष जोशी यांनी सांगितले.
भगवान मंडलिक, डोंबिवली

दुर्मीळ रानपिंगळाही आता डोंबिवलीकर  
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील जंगलात आढळणारा दुर्मिळ पिंगळा आढळून येत आहे. रात्रीच्या वेळेत हा पिंगळा रस्त्यावरील दिव्यांवरील किटक खाण्यासाठी येतो. देवीचापाडा भागातील खाडी किनारा भागात या पिंगळ्याचे वास्तव्य आहे. चित्कार सोडून आपण आल्याचा इशारा नेहमी पिंगळा देतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. डिसेंबर ते मार्च महिन्यात अनेक दुर्मिळ, स्थलांतरित पक्षी खाडी किनारा भागात पाहण्यास मिळतात.

झाडांवरील घाव पक्ष्यांच्या मुळावर
* कल्याण-डोंबिवली परिसरातील खाडी किनारा, किनाऱ्यावर असलेल्या जुनाट वृक्षांवर असलेल्या पक्ष्यांच्या वस्त्या, ठाकुर्ली जवळील रेल्वेची वनराई, भोपर, निळजे गावांमधील झाडेझुडपे या ठिकाणी रान पक्ष्यांच्या वस्त्या आहेत. यामध्ये काही दुर्मिळ पक्षी आहेत.
* डोंबिवलीपासून पाच किलोमीटर अंतरावरील उंबार्ली गाव आजही कावळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात शंभर वर्षांपूर्वीची वडाची झाडे आहेत. डोंबिवली, कल्याण पंचक्रोशीतील कावळे या झाडांवर संध्याकाळच्या वेळेत वस्तीसाठी येतात. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. सहसोबती म्हणून उंबार्ली ग्रामस्थांनी या पक्ष्यांना गावातील झाडांवर कुऱ्हाड चालवून बेघर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आजही शेकडो कावळ्यांची माळ, रांगा संध्याकाळी पाच नंतर उंबार्ली गावातील झाडांवर वस्ती करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसते.
* शहरी पट्टय़ातील मोकळ्या जागा इमारतींनी व्यापल्या. आता जागाच शिल्लक नसल्याने खाडी किनारी, वनराई असलेल्या भागांवर विकासकांनी आपले डोळे वटारले आहेत. पक्ष्यांच्या निवाऱ्यापेक्षा त्यांना माणसांचा ‘चलनी’ निवारा महत्वाचा वाटत असल्याने अवाढव्य वृक्ष प्रशासनाच्या संगनमताने जमिनदोस्त केली जात आहेत. या वृक्ष तोडीवर महापालिका, वन विभाग, रेल्वे प्रशासन यांचे कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.