बेकायदा वास्तव्य रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांचे आदेश
ठाणे येथील दिवा भागात नायजेरियन नागरिकांची संख्या सुमारे एक हजारांच्या घरात गेली असून, त्यापैकी काही नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच या नागरिकांना घर भाडय़ाने देताना त्याची नोंदणी पोलीस ठाण्यात केली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात नोंद न करणाऱ्या मालकांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त सिंग यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत दिवा परिसरात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, या भागातील नागरिकांना आजही मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यासाठी जावे लागते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या भागात नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तसेच या भागातील अनेक मालकांनी घरे भाडय़ाने दिली आहेत. नायजेरियन नागरिकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असून हा आकडा सुमारे एक हजारांच्या घरात गेला आहे. वाढत्या संख्येमुळे या नागरिकांचे परिसरात वर्चस्व वाढू लागल्याने स्थानिक रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर या नागरिकांकडून हाणामारीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी घरमालकांना नोटिसा बजावून भाडेकरूची माहिती देणे बंधनकारक केले होते. मात्र, अनेक मालक त्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्त परमवीर सिंग यांनी भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात नोंद न करणाऱ्या मालकांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांना दिले आहेत.

परदेशी नागरिकांसाठी तपास केंद्र
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकाची चौकशी करता यावी आणि कोणत्या देशातून तो आला आहे, याचा सविस्तर तपास करता यावा, यासाठी तपास केंद्र उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावावर राज्य शासनाकडून लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.