|| सागर नरेकर

करोनाच्या भीतीने अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील गावकऱ्यांचा निर्णय

बदलापूर: आपल्या आयुष्यातील निवांत क्षण निसर्गाच्या सान्निाध्यात घालवावे यासाठी मुंबई आणि उपनगरातील नागरिकांनी अंबरनाथ, कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात फार्म हाऊस उभारले होते. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतून थेट या फार्म हाऊसमध्ये आश्रयाला जाण्याच्या विचारात असलेल्या फार्म हाऊस मालकांच्या नियोजनावर स्थानिक ग्रामस्थांनी पाणी फेरले आहे. या फार्म हाऊसकडे जाणारे मार्ग ग्रामस्थांनी रोखले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आपल्याच फार्म हाऊसमध्ये प्रवेश करणे अवघड झाले आहे.

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात काही निवांत क्षण घालवण्यासाठी गेल्या काही वर्षांत निसर्गरम्य परिसरात फार्म हाऊस विकत घेण्याला मुंबईतील अनेक उच्चभ्रू लोकांनी पसंती दिली होती. त्यासाठी अंबरनाथ, कर्जत आणि मुरबाडसारख्या तालुक्यांची निवड करण्यात आली. गेल्या काही वर्षांत मुबलक पाणी, घनदाट झाडे आणि निर्मनुष्य परिसर यामुळे अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, बदलापूर, बारवीचा प्रवाह जातो ती गावे, कर्जत तालुक्यातील नेरळ, माथेरानचा परिसर, मुरबाडमधील सह्यद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये अनेक फार्म हाऊस उभे राहिले. अनेकदा या फार्म हाऊसचा वापर सुट्टय़ा घालवण्यासाठी होत असतो. गावातीलच एखाद्य ग्रामस्थाला या फार्म हाऊसचा ताबा दिला जातो. त्यांच्यामार्फतच या फार्म हाऊसची निगा राखली जाते आहे. गेल्या काही दिवसात राज्यात वाढत असलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता या फार्म हाऊस मालकांनी गर्दीपासून स्वत:ला वेगळे ठेवण्यासाठी या फार्म हाऊसला जाऊन राहण्याचा विचार केला होता. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरआधीच सतर्क झालेल्या ग्रामस्थांनी अशा फार्म हाऊसमध्ये येणाऱ्या मुंबईकर मालकांना येण्यापासून मज्जाव केला आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याबाबत निर्यण घेत अशा फार्म हाऊस मालकांना नोटीस जारी केली आहे. तर या फार्म हाऊसची निगा राखणाऱ्या नोकरांनीच येथे न येण्याची विनंती मालकांना केल्याचे कळते आहे. त्यामुळे हक्काच्या फार्म हाऊसमध्ये निवांत वेळ घालवण्याच्या नियोजन करणाऱ्या मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मात्र करोना प्रादुर्भावासाठीच हा निर्णय घेतला असल्याने त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यास त्या मालकांनी खुशाल आपल्या फार्म हाऊसमध्ये राहण्यासाठी यावे, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते आहे.