कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ७४ करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध नसल्याने शेवटचा उपाय म्हणूून रुग्णांचे नातेवाईक त्यांना पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात घेऊन येत आहेत. या रुग्णालयात २५ खाटांचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. एकाही रुग्णाला उपचारांशिवाय परत जावे लागू नये, यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्न करत आहे. खाट उपलब्ध नसल्यास खुर्ची किंवा बाकड्यावर बसवून प्राणवायू व इतर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत.

रुक्मिणीबाई रुग्णालयात सामान्य आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयात प्रसूती कक्ष आहे. अनेक माता आणि बालके तिथे दाखल असतात. त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून या रुग्णालयात करोनावर उपचार करण्यात येत नव्हते. परंतु, शहरात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत असून खाटा आणि प्राणवायूची सुविधा अपुरी पडत आहे.

उपचारांअभावी रुग्ण दगावण्याची भीती ओळखून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा टिके आणि डॉ. पुरुषोत्तम टिके यांच्या पुढाकाराने रुग्णालयातील वापरात नसलेल्या जागेत खाटा आणि वैद्यकीय सामुग्री ठेवून करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात २५ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. अनेक रुग्ण खाटा मिळतील या अपेक्षेने रुक्मिणीबाई रुग्णालयात येत आहेत.