जनावरांसाठी वापरली जाणारी इंजेक्शन मानवी प्रसुतीसाठी

जनावरांच्या वापरासाठी असलेल्या ‘ऑक्सिटॉसिन’ इंजेक्शनवर चुकीची माहिती नोंदवून त्याची विक्री मानवी प्रसुती प्रक्रियेसाठी केली जात असल्याची धक्कादायक माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईतून पुढे आली आहे. या कारवाईदरम्यान संपूर्ण राज्यातील औषध दुकानांमध्ये अशाप्रकारच्या ५२ हजाराहून अधिक इंजेक्शनचा साठा एका कंपनीकडून विक्रीसाठी वितरित झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, ठाण्यातील एका रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णांवर या इंजेक्शनचा वापर करण्यात आला असून औषध विक्रीच्या तपशीलातून ही बाब उघड झाली आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त माधुरी पवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान ‘ऑक्सिटॉसिन’ इंजेक्शन या एकाच औषधाच्या आवरणावर दोन वेगवेगळे शिक्के असल्याचे आढळून आले. या औषधाचा वापर माणसांसाठी नाही तर जनावरांसाठी आहे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधांचा वापर करावा, अशी एक सूचना त्यावर होती. तर बाहेरील आवरणावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा वापर करावा, असा उल्लेख होता, अशी माहिती अन्न प्रशासनाकडून देण्यात आली. या कारवाईदरम्यान विविध दुकानांमधून औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या औषधांचे उत्पादन करणारी कंपनी पंजाब राज्यातील असून तिचा औषध पुरवठादार उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचा असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तपासातील तथ्य..

ठाणे औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ आणि त्यांचे पथक नियमित तपासणी करत असताना त्यांना औषध दुकानांमध्ये ऑक्सिटॉसिन इंजेक्शनची गैरप्रकारे विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर याप्रकरणी सुरू झालेल्या तपासामध्ये लाइफ केअर मेडिको यांना ठाण्यातील घाऊक औषध विक्रेते श्री जैन फार्मा कंपनीने या औषधांची विक्री केल्याचे समोर आले.

जैन फार्मा कंपनीने एक हजार इतक्या संख्येने औषधांचा साठा रायगडमधील मे. युनायटेड फार्मा कंपनीकडून खरेदी केला असून युनायटेड कंपनीकडून संपूर्ण राज्यात अशाप्रकारे ५२ हजार ५०० इतक्या औषधांचा साठा घाऊक औषध विक्रेत्यांना दिला आहे.

त्यापैकी जैन फार्मा या कंपनीने विकत घेतलेल्या एक हजारांपैकी ३० औषधांचा साठा ठाण्यातील किरकोळ औषध विक्रेत्यांना केला आहे, असेही तपासात उघड झाले आहे.

झाले काय?

महिलेच्या प्रसुती प्रक्रियेदरम्यान ‘ऑक्सिटॉसिन’ इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. तसेच जनावरांसाठीही याच इंजेक्शनचा वापर करण्यात येतो. असे असले तरी महिला आणि जनावरांच्या इंजेक्शनमधील औषधांच्या मात्रांमध्ये मोठा फरक असतो. परंतु ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून शहरातील औषध दुकानांची नियमित तपासणी सुरू असताना त्यामध्ये जनावरांसाठी असलेल्या मात्रेतून ही औषधे महिलांसाठी विक्री केली जात असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली.