दहा वर्षांपासून डोंबिवलीत जागा देण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : सततच्या टाळेबंदीमुळे शाखा बंद करण्याची वेळ आलेल्या डोंबिवलीतील पै फ्रेंड्स अ‍ॅण्ड लायब्ररीला पालिकेकडून गेल्या दहा वर्षांत जागा मिळू शकली नाही. पालिकेची बंदावस्थेत असलेल्या ग्रंथालयाची जागा देण्याची मागणी या संस्थेकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पै फ्रेंड्स अ‍ॅण्ड लायब्ररी या संस्थेची डोंबिवली पूर्वेतील टिळकनगरमधील केवळ एक जागा सोडली तर उर्वरित सर्व जागा भाडेतत्त्वावर आहेत. मात्र, सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे संस्थेला वाचनालयाच्या जागेचे भाडे देणे शक्य होत नसून त्याचबरोबर वीज देयक, कर्मचाऱ्यांचे वेतन, इंटरनेट खर्चही संस्थेला परवडत नाही. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे शाळेसमोरील शाखा ३१ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय वाचनालय व्यवस्थापनाने घेतला आहे. गेली ३५ वर्षे डोंबिवली परिसरात साहित्य चळवळीचे अनेक उपक्रम राबविणारी आणि वाचकांची ग्रंथसंपदेच्या माध्यमातून भूक भागविणाऱ्या या संस्थेसाठी आरक्षित जागा देण्याची मागणी संस्थेचे संचालक करीत आहेत. तसेच अशी जागा नसेल तर डोंबिवलीतील रामनगरमधील आनंद बालभवनमधील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत श्रीकांत टोळ वाचनालयाची बंद अवस्थेत असलेली जागा देण्याचीही मागणी संचालकांनी केली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत पालिका प्रशासनाने जागा देण्याचे औदार्य दाखविले नाही. तत्कालीन सर्व आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना पत्र देऊन बालभवनमधील वाचनालयाची जागा देण्याची मागणी केली होती. सर्वच आयुक्तांनी केवळ तोंडी आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र कागदोपत्री पुढच्या प्रक्रिया झाल्या नाहीत, असे संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले. चार रस्त्यावरील कॉमर्स प्लाझामधील साहित्य संमेलन कार्यालयासाठी देण्यात आलेली जागा ग्रंथालयाला देण्याची मागणी संस्थेने दोन वर्षांपूर्वी पालिकेकडे केली होती. मात्र त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले.

बालभवन वेगळ्या धाटणीचा पालिकेचा प्रकल्प असल्याने तेथील जागा देता येणार नाही. लायब्ररी संचालकांनी पालिका वरिष्ठांची भेट घेऊन मागणी केली तर जागा देण्यासंबंधीचा योग्य निर्णय घेतला जाईल. करोनाकाळ संपला की या लायब्ररीसंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल,असे पालिकेतील मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक प्रकाश ढोले यांनी सांगितले.

३५ वर्षांपासून सेवेत

पै फ्रेन्ड्स लायब्ररी डोंबिवलीत ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. अडीच लाखांहून अधिक ग्रंथसंपदा आहे. ग्रंथालयाचे २० हजारांहून अधिक सभासद असून  सहा शाखा आहेत. एकूण सुमारे १०० कर्मचारी या शाखांमध्ये काम करतात. मुंबई, पुणे येथील सदस्यांना नियमित घरपोच पुस्तक सेवा दिली जाते.

भाडय़ाच्या जागेतील ग्रंथालयाचे भाडे, तेथील कर्मचाऱ्यांना वेतन देणे ग्रंथालयाला अवघड झाले आहे. यामधून शास्त्रीनगर भागातील ग्रंथालय बंद करण्यात येत आहे. टाळेबंदी अशीच चालू राहिली तर ग्रंथालये कशी चालवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– भूषण पत्की, जनसंपर्क अधिकारी, पै फ्रेन्ड्स लायब्ररी