ज्योत्स्ना कदम, चित्रकार, लेखिका

मला पुस्तके वाचण्याची आवड लहानपणापासून होती. या वयात मला परीकथा, जादूच्या कथा फार आवडायच्या. आई मला दररोज रात्री एक गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवायची. पुस्तक वाचल्याशिवाय आम्ही भावंडे झोपायचो नाही. पाचवी-सहावीमध्ये गेल्यावर ‘श्यामची आई’, ‘किशोर’, ‘चांदोबा’, ‘शेवग्याच्या शेंगा’ यांसारखी मासिके वाचायला आम्हाला आवडू लागले. दहावी आणि अकरावीत असताना वि. स. खांडेकर यांची ‘दोन मने’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’ अशी पुस्तके वाचली. रणजीत देसाई, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके वाचायला आवडायची. पुस्तक वाचण्यात मन गुंतल्यावर कोणत्याच गोष्टीचे भान नसायचे. मला एक सवय होती जी आजही मी जपली आहे. कोणतेही पुस्तक वाचून संपल्यावर त्या कथेतील प्रसंग आणि कथानक मला दृश्यांगाने अनुभवायला फार आवडायचे. तासन्तास मी डोळ्यासमोर ते चित्र तयार करायचे आणि कागदावर त्याचे चित्र काढायचे. या माझ्या सवयीमुळेच माझ्यातील चित्रकार तयार होत गेला. यामुळे माझी कल्पनाशक्ती वाढली. या वयात मला बालकवींच्या कविता, केशवसुत, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या कविता वाचायला फार आवडायचे.

family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केल्यावर माझ्या वाचनात बदल होत गेला. कथा आणि कादंबऱ्या याचबरोबर प्रवासवर्णने, वैचारिक आणि ललित लेखन मला आवडायला लागले. गंगाधर गाडगीळ यांच्या ‘गोपुरांच्या प्रदेशात’मध्ये दक्षिण भारतातील गोपुरांचे सुरेख वर्णन केलेले आहे. अनंत काणेकरांचे ‘निळे डोंगर’, ‘तांबडी माती’ तसेच भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’, ‘बिढार’, विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’, गो. नि. दांडेकरांचे ‘माचीवरला बुधा’, ‘लव्हाळी’ हे पुस्तक वाचायला आवडले. आरती प्रभू यांचे ‘रात्र काळी घागर काळी’, ‘कोंडुरा’ या पुस्तकांनी माझ्या विचाराला आकार दिला. संभाजी कदम यांच्या शिकवण्यामुळे मला सौंदर्यशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयावरचे वाचायला लागले. आपल्या शब्दांना कागदावर उतरवणे आवडायला लागले. या काळात राम पटवर्धनाचे ‘पाडस’, डॉ. यशवंत पाटलांचे ‘ब्राह्मगिरीची सावली’ आणि ‘अंगणातले आभाळ’, ‘सत्यकथा’, ‘मौज’ यांसारखी पुस्तके माझ्या वाचनात आली. ‘एज्युकेशन थ्रू चाइल्ड आर्ट’, ‘आर्ट अ‍ॅण्ड चाइल्ड’ ही मरीन रिचर्डसन यांची पुस्तके मी वाचली. माझ्या जडणघडणीत माझे गुरू आणि पती संभाजी कदम यांचा खूप मोठा वाटा आहे. मला ‘योग वशिष्ठ’ या ग्रंथाची ओळख करून दिली. तिन्ही भाग माझ्या संग्रहात आहे. म. वा. धोंडांचे ‘रापण’, के. वी. बेलसरेची अध्यात्मावरची पुस्तके, ज्ञानेश्वरीचे खंड मला मानसिक शांती देतात. माझे सर आणि मी हे पुस्तकसुद्धा मला आवडते. लांबच्या प्रवासात ‘मनाची शक्ती’ हे पुस्तक बरोबर असते. पुस्तक हे विचारांचे टॉनिक आहे. सध्या माझ्याकडे अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. अनेक दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह आहे. भरताचे नाटय़शास्त्र, जगातील म्युझियमविषयक पुस्तके, इजिप्तीशियन, युरोपियन चित्रकला, शिल्प, इंग्लिश साहित्य असा एक हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे. चांगल्या वाचनामुळे आपली पंचेंद्रिये ताजी राहतात. विचार, आचार आणि चिंतनात एक चैतन्य भरून येते. पुस्तक हे सजीव असून मला माझ्या मित्रासारखे भासते. या पुस्तकाने मला आतापर्यंतच्या प्रवासात खूप चांगली साथ दिलेली आहे. पुस्तकांचे एक एक पान उलगडून ते वाचण्यात एक वेगळाच आनंद असतो. हा आनंद इतर कोणत्याही आधुनिक प्रकारच्या साधनाने मिळत नाही.

शब्दांकन :  मानसी जोशी