चिंतामणी हसबनीस यांनी डोळसांबरोबरच अंध व्यक्तींनाही अनुभवता येतील अशी चित्रे काढली असून त्याचे प्रदर्शन २९ सप्टेंबरपासून वरळी येथील नेहरू सेंटर कला दालनात भरविण्यात येणार आहे. ‘क्लोज्ड आइज् अ‍ॅण्ड ओपन माइण्ड्स’ असे या प्रदर्शनाचे नाव असून ‘ब्लॅक’ चित्रपटातील अमिताभ बच्चनची व्यक्तिरेखा असो की दिलीप प्रभावळकर यांचे हसबनीस यांनी काढलेले चित्र असो, या प्रदर्शनातील प्रत्येक चित्र अंध मित्र-मैत्रिणींनाही अनुभवता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल अशी आहेत. यात मुख्यत्वे पोटर्र्ेट आहेत. ५ ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन पाहायला मिळेल. भारतातील पहिले, अंध व्यक्तींनाही अनुभवता येतील अशा चित्रांचे हे प्रदर्शन आहे. २२ चित्रे यात असतील. दृष्टीहिनांना सलग आणि संपूर्ण अनुभव मिळावा म्हणून ८ चित्रे जोडून त्यांची एक भिंतच प्रदर्शनात उभी केली जाणार आहे. या भिंतीवर जागोजागी दृष्टीहिनांना वाचता येईल असे सुविचार, विनोद, चुटके, कविता, व स्पर्शाने जाणवतील अशी चित्रे काढली आहेत. अंध व्यक्ती जेव्हा या भिंतीवरील मजकूर वाचत असेल तेव्हा आपल्याला समोर दिसणाऱ्या या दृश्याचा वेगळाच अर्थ डोळस व्यक्तींना जाणवेल, असे हसबनीस यांनी म्हटले आहे. चित्रातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल अशा प्रकारचे उपकरणदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

लता दीदी, पं. रवी शंकर, पं. शिवकुमार शर्मा यांचीही चित्रे हसबनीस यांनी काढली आहेत. संपर्क- विदुला- ९६३७१०९२५५.