शिकारीसाठी आणलेली बंदूक दाखवताना अनावधानाने मेव्हण्याकडून बंदुकीचा चाप दाबला गेल्याने भावोजीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी लहान्या सदू भोईर (वय २५) याला अटक केली आहे.

पालघरमधील गारगाव येथे राहणारे हरी बच्चू गडग (वय ३९) हे पत्नी आणि मुलांसोबत सणासुदीनिमित्त शिगाव सुमडीपाडा येथे सासूरवाडीला आले होते. शुक्रवारी रात्री मेव्हणा लहान्या भोईर (वय २५) हा हरी यांना शिकारीसाठी आणलेली नवी बंदूक दाखवत होता. ही बंदूक त्याने गावात राहणाऱ्या रोहित तांबडा याच्यासाठी आणली होती. रोहित हा शिकारीसाठी ही बंदूक वापरणार होता.

हरी यांना बंदूक दाखवताना लहान्याच्या हातून अनावधानात चाप दाबला गेला आणि बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी हरी यांना लागली. छातीत गोळी लागल्याने हरी यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला याची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती. मात्र, हरी यांच्या पुतण्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी लहान्या आणि रोहित या दोघांनाही अटक केली आहे. सदोष मनुष्यवध आणि विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.