दडपशाही आणि आणीबाणीला सुरुवात झाल्याची संतप्त प्रतिक्रिया

वसई : प्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार पोलिसांची दडपशाही असून ही आणीबाणीची सुरुवात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सायमन मार्टिन यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या, निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्यांना पोलिसांकडून भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये नोटीस बजाविण्यात येते. वसईत अनेकांना या नोटिसा पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांनाही ही प्रतिबंधात्मक नोटीस पाठवण्यात आली आहे. आपल्या हातून दखलपात्र गुन्हा घडण्यास, हस्तकांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. सायमन मार्टिन हे राज्य आणि केंद्र शासन पुरस्कारप्राप्त साहित्यिक असून सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. अशा प्रकारे त्यांना नोटिसा दिल्याने साहित्यिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसई पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्या सहीने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

मला नोटीस हातात मिळाल्यानंतर मोठा धक्का बसला. ही आणीबाणीची सुरुवात आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी कुठल्या पक्षात नाही, कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही. राजकारणाशी माझा संबंध नाही. तरी मला ही नोटीस का, असा सवाल त्यांनी केला. आजवर माझ्या नावावर एकही अदखलपात्र गुन्हा नाही. आंदोलनाचेही गुन्हे नाहीत, मग मला अशी नोटीस पाठवून पोलीस ही दडपशाही करू पाहात आहे, असे त्यांनी सांगितले. मी साधा कवी असून माझे हस्तक असल्याचा जावईशोध पोलिसांनी कसा लावला, असा सवाल त्यांनी केला.

मार्कुस डाबरे यांनाही नोटीस

वसई पोलिसांनी हरित वसईचे अध्यक्ष मार्कुस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्यां डॉमनिका डाबरे यांनाही नोटिसा पाठवल्या आहेत. वसईतील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० जणांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ही सरकारची मुस्कटदाबी असून याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मार्कुस डाबरे यांनी दिली. आजवर अनेक निवडणुका झाल्या. मात्र असा प्रकार पहिल्यांदा होत असून जनतेची गळचेपी करण्याची करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांच्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा येऊ  शकते, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, अशा लोकांना आम्ही नोटिसा पाठवत असतो. सायमन मार्टिन यांना नोटीस का काढली याची चौकशी केली जाईल.

– विजयकांत सागर, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक