पालघर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मांडूळ जातीचे दोन साप जप्त केले आहेत. पालघर जवळील मनोर येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मांडूळ जातीच्या या सापांची किंमत दीड कोटी रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेला एक जण राजकीय पक्षांशी संबंधित आहे. हे साप दुर्मिळ असून जादूटोणा आणि औषधासाठी वापरतात.

सुनील पांडुरंग धानवा आणि पवन भोया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील धानवा हा पालघर जिल्ह्यातील चहाडे गावचा रहिवासी आहे. सुनील धानवाने हे मांडूळ जातीचे दोन साप पाळले होते. स्थानिक गुन्हे शाखेला त्याबद्दल माहिती मिळाली होती. पालघरमध्ये मांडूळ साप सापडण्याची ही पहिली घटना आहे.

मंगळवारी रात्री या दोघांना अटक करण्यात आली. एक मांडूळ चार किलो वजनाचा असून त्याची किंमत एक कोटी २० लाख तर दुसऱ्या मांडूळाची किंमत ३० लाख रुपये आहे. या दोघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ३९ (३)सह ५१ (ब) अंतर्गत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडूळ  म्हणजेच रेड सॅन्ड बोआ
मांडूळ नावाचा बिनविषारी व अत्यंत दुर्मीळ प्रजातीचा साप आहे असे सर्पतज्ञांनी सांगितले. या सापाची सरासरी लांबी २ फूट ६ इंच एवढी असून काळा तपकिरी रंगाचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही या सापाची कोटयावधी रुपये असते.

सदर सापाचे तोंड व शेपटी दिसायला साधारण सारखीच असते. मऊ जमिनीत राहणार हा साप कोरड्या जागी राहण्यास पसंती दर्शवतो. पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास हा जमिनीवर येतो, या सर्पामुळे काळा जादू करता येतो अशी लोकांची अंधश्रद्धा आहे. आणि  त्यामुळेच या प्रजातीचे सापांचे आस्तित्व धोक्यात आले आहे.