मोठा गाजावाजा करीत पालघर जिल्ह्याची निर्मिती केली गेली असली तरी येथील अपुऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा भार अजूनही ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या महापालिका तसेच अन्य विभागांच्या दैनंदिन कामकाजावर पडू लागला आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होत असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीची कामे ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, उल्हासनगर महापालिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज थंडावले आहे.
नव्यानेच निर्मिती झालेल्या पालघर जिल्ह्यात अद्याप पुरेशी प्रशासकीय यंत्रणा नसल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवरच येथील कामकाजाची जबाबदारी येऊन पडते. येत्या जून महिन्यात वसई-विरार महापालिकेची निवडणूक होत असून पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतरची ही एक महत्त्वाची निवडणूक आहे.  या निवडणुकीच्या कामासाठीही ठाणे जिल्ह्यातून कर्मचाऱ्यांची फौज रवाना करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांतील विविध विभागांचे कर्मचारी या निवडणुकीच्या कामासाठी
या आदेशामुळे ठाणे जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वसई-विरारमध्ये हेलपाटे घालावे लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तसेच पालघर वेगळा जिल्हा असतानाही तिथल्या निवडणुकांसाठी आम्ही काम का करायचे, असा सवाल त्यांच्यामधून उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता महापालिका निवडणुकांच्या नेमणुका कोकण विभागीय आयुक्तांकडून होत असल्याचे सांगण्यात आले.