News Flash

पालघर जिल्ह्यत पोलीसबळ अपुरे

पालघर जिल्ह्यची निर्मिती झाल्यानंतर २३ पोलीस ठाणी तयार करण्यात आली.

प्रातिनिधीक छायाचित्र

|| सुहास बिऱ्हाडे

अतिरिक्त कामाचा ताण; दोन महिन्यांत तीन पोलिसांचा मृत्यू

वसई : पालघर जिल्ह्याच्या पोलीस दलात गेल्या दोन महिन्यांत पाच पोलिसांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यात तीन पोलीस दगावले. तरुण पोलिसांचा अचानक मृत्यू झाल्याने सारे पोलीस दल हादरले आहे. कमी मनुष्यबळ आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवरच परिणाम होऊ  लागला आहे. पालघर जिल्ह्यत ५० टक्के पोलीस बळ कमी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पालघर जिल्ह्यची निर्मिती झाल्यानंतर २३ पोलीस ठाणी तयार करण्यात आली. २०१४मध्ये जे मनुष्यबळ होते, तेवढचे मनुष्यबळ पोलीस दलात आजही आहे. मागील सहा वर्षांत त्यात वाढ झालेली नाही. सध्या पालघर जिल्ह्यत एक पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय पोलीस अधिकारी (उपअधीक्षक), २६ पोलीस निरीक्षक, ५३ साहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपनिरीक्षक आणि २ हजार ८५९ पोलीस कर्मचारी असल्याची नोंद आहे.  या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांचा समावेश आहे. मात्र वरील पदे ही केवळ कागदोपत्री मंजूर असून प्रत्यक्षात आठ उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षक, ४४ साहाय्यक पोलीस निरीक्षक, १११ पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ७०६ पोलीस कर्मचारी असल्याची बाब उघडकीस आली आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असला तरी वसई-विरार हा शहरी भाग आहे. वसई-विरारमध्ये सात पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ दीडशे ते दोनशे अधिकारी-कर्चमारी आहेत. किती पोलीस बळ हवे यासाठी गृहखात्यामार्फत अभ्यास गट नेमण्यात आला होता. त्यांनी अहवाल शासनाला सादर केला आहे. एक लाख लोकसंख्येमागे किती पोलीस हवे त्याचे प्रमाण या अहवालात देण्यात आले आहे. जिल्हा विभाजन झाल्यानंतर अनेक पोलीस ठाणे शहर, ठाणे ग्रामीण तसेच इतर शाखांमध्ये विलिन झाले. तसेच अनेक पोलिसांची जिल्हा बदली झाली. मात्र त्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ वसई-विरारमध्येच किमान पाच हजार पोलिसांची आवश्यकता आहे. जिल्ह्यतील पोलीस बळ हे ५० टक्कय़ांनी कमी असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांपासून पालघर पोलीस दलातील एकामागोमाग एक पोलिसांना हृदयविकाराचा झटके येऊ  लागले आहे. या दोन महिन्यांत एकूण पाच पोलिसांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात महामार्ग सुरक्षा पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सूर्यवंशी, तलासरीमधील हेड कॉन्स्टेबल गावित तसेच सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप या तीन पोलिसांचा मृत्यू झाला. तर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक वाल्मिक अहिरे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कमी मनुष्यबळ असल्याने कामावर परिणाम

मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक आदी संवेदनशील शाखेत किमान ५० पोलीस बळ असणे आवश्यक असले तरी या शाखेत केवळ ७ ते ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना अपेक्षित काम करता येत नसल्याची खंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस बळ कमी असल्याचा परिणाम कामावर होत आहे. जिल्ह्यात गुन्ह्यंची संख्या वाढत असून त्याची उकल होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

आयुक्तालय कागदावरच

वसई-विरारसह मीरा-भाईंदर शहर मिळून पोलीस आयुक्तालयाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र निधीअभावी आयुक्तालय अस्तित्वात आलेले नाही. सध्या त्यांची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बळ मिळणार नसल्याने पोलिसांची अधिक कसोटी लागणार आहे.

पालघर पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करत आहोत.  ताणतणावमुक्त शिबिर, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा भरवत असतो. – विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:24 am

Web Title: palghar district police force akp 94
Next Stories
1 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा
2 रेल्वे पोलीस सुविधांपासून वंचित
3 व्यवसायाच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा
Just Now!
X