पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी हा भाग गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला आहे. ९ वाजून १३ मिनिटांनी पहिला तर ९ वाजून १५ मिनिटांनी दुसरा भूकंप आला असून भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले होते.

पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे लहान- मोठे धक्के बसत आहेत. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-३ मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी देखील केली होती.

गुरुवारी डहाणू, तलासरी या भागात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दोन मिनिटांच्या अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धरणांशी संबंध?

या भागात स्वातंत्र्योत्तर काळात २५ डिसेंबर २०१७ आणि जव्हार तालुक्यात वाळवंडा भागामध्ये २ जानेवारी २०१८ रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर त्याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसवण्यात आले होते. डहाणू भागात अचानक सुरू झालेली भूगर्भातील हालचाल ही रहिवाशांसाठी चिंतेची बाब आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमणगंगा खोरे, वैतरणा खोऱ्यांतर्गत जिल्ह्यात अनेक लहान – मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून खोऱ्यात २० ते २५ नवीन पाटबंधारे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पालघर जिल्ह्यात सध्या ७७ पाटबंधारे प्रकल्प कार्यरत, तर ७७ प्रकल्पांची कामे सुरू असून ७७ पाटबंधारे प्रकल्प प्रस्तावित आहेत.

सध्या बसणाऱ्या धक्क्यांचा केंद्रिबदू डहाणू शहरापासून सुमारे सात किलोमीटरवर आहे. त्यापासून दापचरी दुग्ध प्रकपातील कुर्झे (तलासरी) धरण १८ किलोमीटरवर, सूर्या प्रकल्पातील कवडास २३ किलोमीटर, तर धामणी धरण ३० किलोमीटरवर आहे. त्यांच्यातील पाणीसाठ्याचाभूकंपाच्या धक्क्याशी संबंध आहे का, हा सध्या नागरिकांत चर्चेचा विषय आहे.