दिवाळीमुळे निवडणूक कार्यक्रमात बदल

देशातील पाच राज्यांमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असला तरी त्यात पालघरचा समावेश करण्यात आलेला नाही. दिवाळीनंतरच या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल व निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

कृष्णा घोडा यांच्या निधनाने पालघर (राखीव) मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक जून महिन्यात जाहीर करण्यात आली होती, पण गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार राजेंद्र गावित यांनी घोडा यांच्या निवडीस उच्च न्यायालयात आव्हान दिले होते व ती याचिका प्रलंबित होती. उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यानेच जूनमध्ये होणारी पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने स्थगित केली होती. दरम्यानच्या काळात ही याचिका निकाली निघाली.

निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. या कार्यक्रमात पालघर पोटनिवडणुकीचा समावेश नाही. या संदर्भात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, पालघर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हा दिवाळीनंतर जाहीर केला जाणार आहे. ऐन दिवाळीच्या सणात निवडणुकीचा अडथळा येऊ नये म्हणूनच राज्य निवडणूक विभागाने तशी विनंती केली होती. यानुसार दिवाळीनंतर म्हणजेच १५ नोव्हेंबरनंतर पालघर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात या पोटनिवडणुकीची शक्यता आहे.

पक्षांची तयारी सुरू!

पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित यांनी मतदारसंघात दौरे वाढविले आहेत. पालघरची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेने डहाणूजवळील वाढवण बंदरास विरोध सुरू केला आहे. कारण पालघरमध्ये मच्छीमार समाजाची मते मोठय़ा प्रमाणावर आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीनेही ही पोटनिवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.