निखिल मेस्त्री

वाढत्या शहरीकरणात सिमेंट क्राँक्रीटची जंगले उभारली जात असताना या जंगलात आबालवृद्धांना क्षणभर विरंगुळ्यासाठी आवश्यक असलेली उद्यान आणि बालउद्याने मात्र हरवली गेली आहेत. जी आहेत त्यांची दुरवस्था झाली आहेत. पालघर जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये अशी परिस्थिती उद्भवली असून काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यतील डहाणू, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, वाडा, जव्हार व पालघर आदी प्रमुख शहरांच्या ठिकाणी शहरीकरण वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर लोकसंख्याही वाढत आहे. सर्व शहरांमध्ये निवासी संकुले उभी राहत आहेत. बांधकाम व्यावसायिक केवळ आर्थिक उत्पन्नाच्या पोटी जागेचा वापर अधिक सदनिका तयार करण्यासाठी करीत आहेत. मात्र हे करताना या सदनिकांमध्ये राहण्यास येणाऱ्या रहिवाशांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या उद्यान, बालउद्यानांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. बांधकामास परवानगी देणाऱ्या नगरपंचायत आणि नगर परिषदांचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

परिणामी पालक आपल्या मुलांना रिसॉर्ट, प्राणिसंग्रहालय, कृत्रिम उद्याने, मॉल आदी ठिकाणी विरंगुळ्यासाठी महिन्यातून एकदा किंवा सहल म्हणून घेऊन जात आहेत. शहरांमध्ये काही बालोद्याने असली तरी त्यात सुविधांची असलेली कमतरता पाहता ती उपयोगाची ठरत नाहीत. पालघर शहराबरोबरीने सफाळे-केळवे-माहीम-मनोर गावांच्या प्रमुख ठिकाणे व मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये ही अशीच अवस्था आढळून येत आहे.  याबाबतीत पालघरच्या नगराध्यक्षा डॉ.उज्ज्वला काळे यांना संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता. त्यांना संदेशद्वारे कळविल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. पालघर नगर परिषद हद्दीतील पूर्वेकडील वीरेंद्रनगर भागात खासदार राजेंद्र गावित यांच्या निधीतून मोठे वन उद्यान उभारण्यात आले. या उद्यानात विविध वनौषधी झाडांची लागवड करण्यात आली. त्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र याही उद्यानात नागरिकांना बसण्याची  सुविधा नाही. उद्यानात मुलांना खेळण्यासाठी  साहित्य सुविधा नाही. या उद्यानाचे निर्माण कार्य सुरू असताना ते येथील नागरिकांसाठी आहे असे सांगण्यात आले होते. मात्र नामफलकावरून  ते वनविभागाचे असल्याचे दिसून येते.

तीनच उद्याने त्यातील एकच सुस्थितीत

पालघर शहरात तीनच उद्याने आहेत. त्यातील दोन उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यातील पालघर ग्रामपंचायत असतानापासून आर्यन शाळा रस्त्यावर असलेल्या आणि आता परिषदेचे बाळासाहेब ठाकरे उद्यान सुसज्ज असले तरी लोकसंख्येच्या मानाने ते अपुरे पडत आहे. संध्याकाळच्या वेळी या उद्यानातील गर्दी वाढतच आहे. या व्यतिरिक्त शहरात इतर कुठेही विरंगुळ्यासाठी उद्यान नाही.   पालघर पूर्वेकडे नवली शाळेसमोर नगर परिषदेच्या असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानात लहान मुलांच्या खेळण्यासाठी काही साधन असली तरी ती सुरक्षित नाहीत. संध्याकाळी या उद्यानात प्रकाशही नसतो, त्यामुळे एकंदरीत हे उद्यान म्हणून शिल्लक राहिले आहे. पालघर शहरातील मनोर-माहीम रस्तास्थित ज्येष्ठ नागरिक भवन हे नगरपालिकेचे आणखी एक उद्यान. मात्र या उद्यानात सुशोभीकरणाऐवजी गवत वाढलेले दिसते. त्यामुळे या उद्यानात विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती कायमची सतावत असते.  काही प्रमाणात साधने ठेवली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही.