15 October 2019

News Flash

राष्ट्रीय महामार्गावर किती अपघात?, संकेतस्थळावर अपघातांची आकडेवारी उपलब्ध नाही

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरत ते दहिसर या पट्टय़ात चारोटी, खानिवडे, वापी आणि वलसाड हे चार टोल नाके आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिनिधी, पालघर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघातप्रवण क्षेत्रे असून या ठिकाणी वर्षांला शेकडो अपघात होतात. मात्र यापैकी अनेक अपघातांची नोंद राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संकेतस्थळावर दिसत नसल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी या संकेतस्थळावर दर्शविण्यात येणारी अपघातांची संख्या आणि प्रत्यक्ष घडणारे अपघात यांच्यात तफावत असल्याचे दिसून येत होते.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरत ते दहिसर या पट्टय़ात चारोटी, खानिवडे, वापी आणि वलसाड हे चार टोल नाके आहेत. या टोल नाक्यांवर तसेच महामार्गावर ठिकठिकाणी अपघात घडल्यास रुग्णवाहिका आणि इतर मोफत सुविधा पुरवणाऱ्या संस्थांची माहिती प्रसारित करणे अनिवार्य असते. किंबहुना या सेवा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या आयआरबी या कंपनीने पुरवणे अपेक्षित आहे. असे असताना चारोटी या ठिकाणी असलेल्या टोलनाक्यावर रुग्णवाहिकेसाठी एका सेवाभावी संस्थेने पुरवलेल्या? रु ग्णवाहिकांसाठी भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. याखेरीज डहाणू ते वापी या पट्टय़ात कोणताही मोठा अपघात झाला आणि आयआरबीच्या कॉल सेंटरला मदतीसाठी संपर्क केला तर तेथील ऑपरेटर चारोटी येथे असलेल्या सेवाभावी संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाला दूरध्वनी करून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुजरातमध्ये असलेल्या टोलनाक्यावर अपघातसमयी मदतकार्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेला १०८ क्रमांक रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघातानंतर क्रेनची गरज भासल्यास त्याबाबतही काही खासगी क्रेनचालकांना अपघात ठिकाणी मदत करण्याची कामगिरी सोपविण्यात येते.

त्यामुळे अपघातांची नोंद आयआरबी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दप्तरी किती प्रमाणात होते याबद्दल शंका आहे. २३ मार्च २०१४ रोजी चारोटी नाका येथे एक रासायनिक टँकरचा भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता. या व इतर लहान मोठय़ा अपघातांची राष्ट्रीय महामार्गाच्या संकेतस्थळावर नोंद झाली नसल्याचे दिसून आले होते. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर सुरत-दहिसर दरम्यान घडलेल्या अपघातांचीच माहिती उपलब्ध नाही. या पट्टय़ात असलेले अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी कोणतीही विशेष उपाययोजना अमलात आणण्यात आली नसून अपघातानंतर खासगी, राज्य शासनाच्या किंवा सेवाभावी संस्थेच्या रुग्णवाहिकांचा वापर होत असल्याने अपघातांची संख्या गुलदस्त्यात राहत आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जून २०१८ मधील माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून राज्यात असलेल्या २६ अपघातप्रवण क्षेत्रांपैकी आठ अपघातप्रवण क्षेत्रांत दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून ११ ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती प्रसिद्ध आहे. मात्र विविध स्तरावर अपघातांचा अभ्यास झाला असता पालघर जिल्ह्यतील अपघातप्रवण क्षेत्रातील संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरत येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सर्व टोलनाक्यांवर ‘एनएचएआय’चा उल्लेख असलेली रुग्णवाहिका व पुरेशा क्षमतेची क्रेन असणे आवश्यक असल्याचे सांगितले. अपघातांच्या संकेतस्थळावरील माहितीबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

—–

चारोटी येथे २०१४मध्ये घडलेल्या अपघाताची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध नाही. मेंढवण येथील अपघातप्रवण क्षेत्रांत दरवर्षी अनेक अपघात घडतात, त्यासाठी कोणती उपाययोजना केली नाही किंवा त्याठिकाणी कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. मेंढवण परिसरात मोबाइल नेटवर्कही नाही. याबाबत अनेक तक्रारी करूनही त्याची दाखल घेतली जात नाही.

– अमित घोडा, आमदार

First Published on January 12, 2019 9:46 am

Web Title: palghar no statistics of accident on national highway