विक्रेते, नागरिकांकडून सर्रास वापर

राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचा पालघरमध्ये अक्षरश: फज्जा उडाला आहे. पालघर नगर परिषदेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा दावा केला असला तरी शहरात आजही खुलेआम प्लास्टिकचा वापर केला जात आहे. शहरातील बाजारपेठा, मासळी बाजार, किराणा मालाची दुकाने, भाजीबाजार, खानावळी, अल्पोपहार केंद्र यांच्याकडून सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात असून नगर परिषदेकडून मात्र कुणावरही कारवाईचा बडगा उगारला जात नाही.

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन तीन महिने झाले असतानाही पालघर शहरात राज्य शासनाच्या या निर्णयाकडे सर्रास काणाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात सहजपणे मिळत आहेत हे ग्राहकांच्या लक्षात येत असल्याने ते प्लास्टिक पिशवी मागताना दिसतात. मालाची विक्री होत आहे म्हणून दुकानदार किंवा भाजीपाला विक्रेते प्लास्टिक पिशवी सहज ग्राहकांना देत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. नगर परिषदेने यासाठी प्लास्टिक बंदीविरोधी पथक तयार केले आहे. मात्र याकडे ते डोळेझाक करत असल्याने प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे.

नगर परिषदेच्या या पथकाने नुकतेच शहरातील विविध ठिकाणी छापे मारून प्लास्टिक वापर करणाऱ्या फरसाण मार्ट, खानावळ, अल्पोपहार केंद्र, व्यापारी आदींवर कारवाया केल्याचे दिसते, मात्र ही कारवाई म्हणजे फार्सच असल्याचे नगर परिषदेकडील माहितीवरून दिसते. या पथकाने आतापर्यंत नऊ जणांवर कारवाई केल्याची माहिती नगर परिषदेच्या नोंदीत मिळाली आहे. या नऊ जणांवर झालेल्या कारवाईत ५१ किलो पिशव्या जप्त केल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे.

नगर परिषदेने केलेली प्लास्टिक बंदी फक्त बोळवण आहे. या निर्णयाची कुठेही काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.

– डॉ. पारितोष राणा, अध्यक्ष, लायन्स क्लब, पालघर

प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करून त्याद्वारे जनजागृती नगर परिषदेकडून करण्यात आली. त्यानंतरही प्लास्टिकचा वापर सुरू राहिला तर यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

– उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघर नगर परिषद