दुपारच्या प्रहरी कडकडीत ऊन, मध्येच पावसाचे ढग, कधी तरी शिडकावा, वातावरणातील आद्र्रता यामुळे पालघर परिसरातील सरकारी तसेच खासगी दवाखान्यांमधील रुग्णांची गर्दी वाढत आहे. संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोकला, सर्दी, ताप, घसा दुखणे आदी संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे. यामुळे येथील अनेक खासगी व शासकीय दवाखान्यांमध्ये औषधोपचारांसाठी रुग्णांची एकच गर्दी पाहावयास मिळते आहे. दररोज परिसरातील व त्याबाहेरील सुमारे ३०० रुग्ण खासगी व शासकीय दवाखान्यांत संसर्गजन्य आजारावर उपचार घेण्यासाठी येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे परिसरात डासांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजारही डोके वर काढत आहेत.

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह पुरेसा औषधसाठा रुग्णांसाठी उपलब्ध आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी नाकावर रुमाल किंवा मास्क बांधणे, पिण्यायोग्य स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता राखणे, उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळणे, थंड पाणी टाळणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रुग्णास जास्त बरे वाटत नसल्यास दवाखान्यात योग्य ते उपचार घेण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

* पालघरमध्ये एच १ एन १चा (स्वाइन फ्लू) संशयित रुग्ण आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णावर मुंबई येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आली आहे. परिसरात तात्काळ तपासणी सुरू करण्यात आली आहे. पूर्व उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली आहेत.

– डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पालघर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar residence do not get interrupted
First published on: 20-09-2018 at 02:21 IST