पालघरमध्ये सहा तर वसईत दोन जणांचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित

वसई/पालघर : वसई-विरार शहरात आतापर्यंत करोनाची लागण झालेले ५ रुग्ण आढळून आले असून दोन संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रशासनाने ४१६ जणांना विविध ठिकाणी अलगीकरणात ठेवले आहे तर ३४७ जणांचे घरातच अलगीकरण केले आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयात करोना संशयित पाच जण वैद्यकीय देखरेखीखाली दाखल करण्यात असून त्याच्यासह सहा जणांचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित आहेत.

वसई-विरार शहरातून अनेक जण परदेशी गेले होते. ते परदेशातून परतू लागल्याने शहराला करोनाचा धोका वाढू लागला आहे. परदेशी प्रवास करून आलेल्यांना अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रशासनाने  विविध ठिकाणी हॉटेल आणि रिसॉर्ट ताब्यात घेतली असून तेथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आतापर्यंत ४१६ जणांना अशा विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे तर ३४७ जणांचे आपल्याच घरात अलगीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बेजबाबदार नागरिक

परदेशातून आलेल्या प्रवाशांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे, तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अलगीकरणाचा शिक्का असलेले ६९ नागरिक हे बंदी असतानाही बाहेर फिरत होते. त्यापैकी ६८ जणांना पकडून अलगीकरणा कक्षात ठेवण्यात आले आहे तर एकाला घरात ठेवण्यात आले आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयात पाच जण वैद्यकीय देखरेखीखाली

पालघर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात करोना संशयित पाच जण वैद्यकीय देखरेखीखाली दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांना लक्षणे असून पाचही संशयितांचे घशांचे नमुने तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत, तर याआधी एक तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील एकूण सहा संशयितांचे घशांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून या सहा जणांचे अहवाल अजूनही जिल्हा आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेले नाहीत. पालघरमध्ये आत्तापर्यंत तपासलेल्यापैकी एकहीजण करोनाबाधित नाही.

५ रुग्ण करोनाग्रस्त, दोघांचे अहवाल प्रलंबित

आतापर्यंत शहरातील एकूण ३० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २३ जणांचे अहवाल हे नेगेटिव्ह आले आहेत तर ५ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाचही जणांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी २ रुग्णाचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. त्यांच्यात करोनाची तीव्र लक्षणे आढळली होती. त्यामुळे वसईतील रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.