*वसई, पालघर, बोईसर, डहाणूमधील सेवा ठप्प

*जिल्ह्यातील शेकडो प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल

राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका पालघर जिल्ह्याला बसला. वसई, नालासोपारा, पालघर, डहाणू येथील एसटी सेवा संपूर्ण ठप्प झाली. आगारातून एकही बस न सुटल्याने शेकडो, प्रवासी, नोकरदार, कामगार आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले.

महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस (इंटक) या संघटनेच्या आदेशानुसार राज्यभरात एसटीचा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज मंडळाप्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी कराराचा फायदा देण्यात यावा यांसह अनेक मागण्या संघटनेने केल्या आहेत. सकाळपासूनच वसई व पालघर आगारांच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर पडली नाही. या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

वसईच्या ग्रामीण भागातील जनतेला एसटीचाच आधार असल्याने त्यांना कामावर जाता आले नाही. वसईच्या पूर्व पट्टीतून येणाऱ्या कामगारांना त्यामुळे खाडा करावा लागला. बोईसर आगारातील कर्मचारी आगारातील प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मारून बसले होते. त्यामुळे एकही बस बाहेर पडू शकत नव्हती. ग्रामीण भागातील प्रवाशांना तालुक्याला किंवा शहरी भागात येण्यासाठी एकही बस नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिव जीवनावर झाला.

रिक्षाचालकांची मनमानी

एसटीच्या संपाचा गैरफायदा वसई, पालघर, बोईसर येथील रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करत होते. रिक्षा भाडय़ास कोणतेही बंधन नव्हते. रिक्षाचालक दुप्पट ते तिप्पट भाडे प्रवाशांकडून वसूल करत होते.

नालासोपाऱ्यात बसवर दगडफेक

नालासोपाऱ्यात गुरुवारी पहाटे नाळे गावातून निघालेल्या एक बसवर अज्ञात इसमाने दगडफेक केली. या दगडफेकीत बसची काच तुटली असली तरी कुणाला इजा झाली नाही. आमचे आंदोलन शांततेत सुरू असून संघटनेच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी ही दगडफेक केल्याचा आरोप इंटकचे वसई अध्यक्ष किरण शिंदे यांनी केला. या दगडफेकीची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.