पालिकेच्या तुळींज रुग्णालयाचा कामात भ्रष्टाचाराचा आरोप

पालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयातील विविध सुविधांवर मागील ५ वर्षांत १० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोटय़वधी रुपयांचा खर्च होत असताना रुग्णांना मात्र सुविधा मिळत नसल्याने या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालिकेने हे आरोप फेटाळले असून झालेला खर्च योग्य असल्याचा दावा केला आहे.

नालासोपारा येथे असलेल्या महापालिकेचे तुळींज हे एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा आणि सेवेबाबत रुग्णांच्या सातत्याने तक्रारी येत असतात. परंतु रुग्णांना मोफत सेवा देण्याच्या नावाखाली मागील पाच वर्षांत रुग्णांच्या चहापाण्यावर आणि चादर, कंबल आणि इतर सुविधांवर १० कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते राजकुमार चोरघे यांनी माहिती अधिकारातून ही बाब समोर आणली आहे

मागील ५ वर्षांत १० कोटी रुपये सेवा सुविधांवर खर्च करण्यात आले आहेत. या १० कोटींतील तपशीलवार माहिती धक्कादायक आहे. २०१५ ते २०१८ पर्यंत महापालिकेने रुग्णांसाठी चादर, ड्रेस, कंबलवर १ कोटी २४  लाख ५० हजार रुपये आणि रुग्णांच्या चहापानावर २ कोटी ३३ हजार रुपये, डॉक्टरांच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणेवर ६ लाख ८१ हजार, रुग्णालयाच्या स्टेशनरीवर ३१ लाख ६७ हजार रुपये तर बिलबुक छपाईवर ७६ लाख ८० हजार रुपये, टेलिफोन व मोबाइलवर २० हजार रुपये, इन्व्हर्टरवर ४० हजार रुपये, जनरेटरच्या डिझेलवर २२ लाख ६१ हजार, जनरेटरची देखरेख आणि दुरुस्ती खर्च १७ लाख ३९ हजार रुपये, रुग्णालयातील यंत्र आणि मशीन देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च ९ कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले.

एकीकडे कोटय़वधी रुपये खर्च होत असले तरी प्रत्यक्षात रुग्णांना सेवा मिळत नाही, असा आरोप चोरघे यांनी केला आहे. रुग्णालयाचा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतिदक्षता विभागाच्या छताचा भाग कोसळला होता तेव्हापासून हा विभाग आजतागायत बंद आहे. या क्षयरोगांवरील निदानासाठी सुविधा नाहीत. पालिका मोफत औषधोपचार करत असल्याचा दावा करते, पण रुग्णांना बाहेरून अनेक औषधे विकत घ्यावी लागतात असे त्यांनी सांगितले. रुग्णांना असलेल्या खाटा अपुऱ्या आहेत. रुग्णांना जमिनीवर झोपून इलाज करावा लागत आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.रुग्णालयात बहुतांश औषधे संपल्याचे सांगून बाहेरून खरेदी करण्यास सांगतात. चहा नाश्ता तर सोडा पण पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नाही, केवळ खाटेचे पैसे घेतले जात नाहीत,’’ अशी तक्रार विजय पुजारी या रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली आहे.

‘रुग्णांना चहा-नाश्ता’

रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर मोफत इलाज केला जातो आणि औषधे मोफत दिली जातात असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. रुग्णांना मोफत चहा नाश्ता दिला जातो, त्यामुळे तो खर्च मोठा वाटतो. इतर सुविधा पुरविल्या जातात, त्यावर हा खर्च झालेला आहे. त्यात कुठेही गैरप्रकार झालेला नसून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असेही ते म्हणाले.