महानगरी विश्वातील धावपळीत आपल्या बाजूला कोण राहतेय, हे पाहायलाही वेळ नसतो. शेजारधर्म ही खूप पुढची गोष्ट झाली. काही संकुले मात्र त्याला अपवाद आहेत. डोंबिवली पूर्व येथील पांचजन्य गृहसंकुल त्यापैकी एक.

पांचजन्य सोसायटी, डोंबिवली (पूर्व)

श्रीरसी, मधुरा आणि पांचजन्य या सात मजली तीन इमारती, एक तीन मजली इमारत, चार रो हाऊसेस आणि तीन बंगले पांचजन्य सोसायटीत आहेत. या संपूर्ण संकुलात एकूण ११० कुटुंबे राहतात. सोसायटीच्या परिसरात भरपूर झाडे आहेत. त्यामुळे संकुलाच्या मुख्य दरवाजामधून आत शिरल्यानंतरच छान प्रसन्न वाटते. या सोसायटीला एका मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच दोन छोटी दारे आहेत. त्यामुळे पायी चालत आल्यास छोटय़ा दारातून प्रवेश करता येतो. प्रत्येक प्रवेशद्वारापाशी सुरक्षारक्षक आहे. रात्री दोन्ही छोटी दारे बंद केली जातात.

सोसायटीमध्ये छोटी बाग आहे. विशेष म्हणजे हा बगिचा सोसायटीतील रहिवाशांनी तयार केला आहे.  प्रत्येकजण आपापली आवड आणि सवडीनुसार येथे वृक्षवेलींची जोपासना करीत असतो. काहीजण घरातील कुंडीत मोठी झालेली झाडे बगिच्यात आणून रुजवितात. बगिच्यात आवळा, गुलाब, तगर, जास्वंद आदी झाडांची लागवड केली आहे. या सोसायटीत सगळे सणवार उत्साहात साजरे केले जातात. ६० टक्के महाराष्ट्रीय आणि उर्वरित इतर प्रांतीय आहेत. त्यात केरळी समाज मोठय़ा प्रमाणात आहे. दरवर्षी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये पाच दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला जातो. या दिवसात धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित केले जातात.

वार्षिक पूजाही होते. क्लबहाऊसमध्ये बॅडमिंटनचा कोर्ट तयार करण्यात आला आहे. तसेच सोसायटीतील सदस्यांना छोटेखानी कार्यक्रम करायचा असल्यास सवलतीच्या दरात क्लब हाऊस उपलब्ध करून दिला जातो. यामुळे बाहेरच्या सभागृहांवर त्यांना अवलंबून राहावे लागत नाही. सोसायटीतील एका ज्येष्ठ महिलेने येथे योगवर्गही सुरू केले आहेत. या सोसायटीत जनरेटरची सोय असल्याने उद्वाहक नेहमीच सुरू असते. शिवाय सोसायटीतीच्या परिसरातील दिव्यांची सोयही जनरेटरवर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे अचानक वीज पुरवठा खंडीत झाला तरीही अंधार होत नाही. सोसायटीतील ज्येष्ठ  महिला परिसरात एकत्र जमतात आणि गीता पठणसारख्या आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करतात. सोसायटीमधील युवा पिढीही हौशी असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे- जाणेही असते. त्यामुळे या तरुणांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते आहे. सध्या सोसायटीमध्ये पार्किंग समस्या उद्भवत असली तरी त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा सदस्यांचा प्रयत्न आहे. तसेच यंदा पर्जन्यजलसंधारण योजना राबविण्यात येणार आहे. सोसायटीतील बहुतेक सदस्य पर्यावरणप्रेमी असल्याने परिसरात कागदाचा तुकडाही पाहायला मिळत नाही.

सोसायटीच्या मागच्या बाजूला आयकॉन हॉस्पिटल आहे. दोहोंच्यामध्ये एक विहीर असून रुग्णालयातील कर्मचारी तसेच सोसायटीचे नागरिक त्याचा वापर करतात. विहिरीची नियमित देखभाल केली जाते. सोसायटीच्या बाहेर पडले की गांधीनगरहून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या शेअर रिक्षा मिळतात. नऊ रुपयांमध्ये रेल्वे स्थानकापर्यंत जाता येते. सोसायटीच्या आवारात अपना बाजारसारखे दुकान असल्याने किराणा माल भरण्यासाठी येथील रहिवाशांना कुठे बाहेर जावे लागत नाही.

पारदर्शक आणि चोख व्यवहार

सोसायटीचा कारभार अतिशय पारदर्शक आहे. कागदपत्रांचा रेकॉर्ड व्यवस्थित जतन करून ठेवला आहे. सोसायटी करतानाच या संकुलाचे कन्व्हेअन्स डीड करण्यात आले आहे. सोसायटीला आता एक तप होईल. दोन वर्षांपूर्वीच सर्व इमारतींना रंगकाम करण्यात आले. हरीश आंबवणे सोसायटीचे अध्यक्ष, अतुल खरे-सचिव तर श्रीपाद ठाकूरदेसाई कोषाध्यक्ष आहेत. संकुलात लवकरच सौरऊर्जा यंत्रणा बसवली जाणार असल्याची माहिती अतुल खरे यांनी दिली.