पालिकेच्या आदेशाला गणेश मंडळांचा हरताळ

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यापूर्वी परवानगी सक्तीची करण्यात आली असली तरी, कल्याणमध्ये महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या परवानगीआधीच मंडप उभारणी सुरू झाल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १७ मंडळांना मंडप उभारणीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील विविध भागांत मंडप उभारणीची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेला मंडळे जुमानत नसल्याचे चित्र आहे.

कल्याण पूर्व, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, खडेगोळवली, डोंबिवली तसेच कल्याणच्या ग्रामीण भागात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी परवानगीपूर्वीच मंडप उभारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंडप परवानगी बंधनकारक केली आहे. मात्र, आतापर्यंत अवघ्या १७ मंडपांना परवानगी देण्यात आली असून आणखी काही अर्ज दाखल झाले आहेत. असे असताना शहरात ठिकठिकाणी मंडप उभारणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मंडप परवानगी प्रक्रियेत प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याचा गणेश मंडळांचा सूर आहे. तर अनेक मंडळे परवानगीसाठीच्या अटींची पूर्तता करत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मंडळांनी सर्व कागदपत्रे सादर केल्यास एका दिवसात ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकाली दिलीप गुंड यांनी सांगितले.

मुदत सहा दिवसांवर

बऱ्याचदा गणेशोत्सव मंडळे अर्ज सादर केल्यावर मंडप उभारणीला सुरुवात करतात. त्यांना काही दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच कल्याण-डोंबिवलीतील गणेशोत्सव मंडळांना येत्या ३ सप्टेंबपर्यंत मंडप परवानगीसाठी अर्ज सादर करता येतील. उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी किंवा रस्त्यांवर खड्डे खणून मंडप उभारणी केली असल्यास त्यांच्यावर कायद्याने कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली.