मृतदेह पाचूबंदरात न आणता त्या-त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत नेण्याची मागणी

वसई : करोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवावर पाचूबंदर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे स्मशानभूमीलगतच्या वस्त्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीला लागून असलेल्या लोकवस्तीत कुष्ठ वसाहत असून नजीकच दिव्यांगांची शाळा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक मृत रुग्णाव्यतिरिक्त अन्य ठिकाणचे मृतदेह पाचूबंदरात न आणता त्या-त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्याची मागणी पुढे येत आहे.

वसईच्या पश्चिमेकडील पाचूबंदर या किनारपट्टीला लागून असलेल्या गावात महापालिकेची स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीला लागूनच दफनभूमीही आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणच्या स्मशानभूमीत करोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारांना महापालिकेचे अधिकारी तसेच काही कर्मचारी उपस्थित होते. वस्तुत: या भागात कोणाही स्थानिक नागरिकास करोनाची बाधा झालेली नाही. ज्या करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले ते सर्व अन्य ठिकाणचे आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी अन्यत्र नेण्याऐवजी रुग्णाच्या निवासस्थानानजीकच्या किंवा ज्या रुग्णालयात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तिथल्या जवळच्या स्मशानभूमीत नेण्याची मागणी पुढे आली आहे.

पाचूबंदर स्मशानभूमीजवळ कुष्ठ रुग्णांची वसाहत आहे. या वसाहतीत कुष्ठ रुग्णांव्यतिरिक्त अन्य आजारांनी बाधित व्यक्तींचेही वास्तव्य आहे. याशिवाय स्मशानभूमीच्या समोरच दिव्यांग मुलांची शाळा आहे. तसेच वाल्मिकी वसाहत आणि मोठय़ा प्रमाणात मच्छीमारांची वस्तीही या स्मशानभूमीच्या लगतच आहे. या स्मशानभूमीत मृतदेह नेताना तो दाट लोकवस्तीतून न्यावा लागतो. त्यामुळे अन्य ठिकाणच्या करोनाबाधित मृतदेहांवर पाचूबंदर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याऐवजी अन्य स्मशानभूमीत पार्थिवाची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात दत्तधाम कुष्ठ वसाहत कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष किशोर कोळी यांनी महापालिकेस निवेदन देऊन परिसरातील नागरिकांची कैफियत मांडली आहे. करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह या भागातून स्मशानभूमीत गेल्यामुळे या भागाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून परिसरात औषधफवारणी करण्याची मागणीही होत आहे.

स्मशानभूमीलगतच्या परिसरातील रहिवाशांच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातील. तसेच परिसरात वेळच्या वेळी औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण करून तिथल्या स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल.

 सुभाष जाधव, प्रभारी सहाय्यक आयुक्त

करोनाबाधित रुग्णाचा मृतदेह ज्या परिसरातून जातो, त्या भागातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण होते. त्यांची भीती दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. शिवाय मयत व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होती किंवा ज्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला, तिथल्या जवळच्या स्मशानभूमीत-दफनभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यास कोणालाच अडचण होणार नाही.

-केतन पाटकर, माजी नगरसेवक