News Flash

धावपटूंवरील अन्यायाचा जाब

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांना पालकांची समजूत काढावी लागली.

संतप्त पालकांनी मैदानात येऊन गोंधळ घातला.

क्रिकेट सामन्यांसाठी स्टेडियममध्ये सरावाकरिता प्रवेश न दिल्याने पालकांचा गोंधळ

ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये शुक्रवारपासून सेलेब्रिटी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आल्यामुळे धावपटूंना मैदानात सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे धावपटूंच्या पालकांनी शुक्रवारी सामन्यादरम्यान गोंधळ घातला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांना पालकांची समजूत काढावी लागली. या संदर्भात सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट

मैदान विकसित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ करण्यासाठी शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस सेलेब्रिटी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रेक्षागृहात धावपटूंना सराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी सरावासाठी गेलेल्या धावपटूंना प्रवेश नाकारत घरी पाठविण्यात आले. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल हे शुक्रवारी सकाळी सेलेब्रिटी सामन्यांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा धावपटूंना सरावास बंदी घातल्याचा जाब विचारण्यासाठी ३० ते ४० पालक मैदानात आले. मैदानात यापूर्वी क्रिकेटपटू आणि धावपटू असे दोघेही सराव करत; पण आता अचानक धावपटूंना सराव करण्यास बंदी घालण्यामागचे कारण काय, असा प्रश्न पालकांनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पालकांसोबत चर्चा केली आणि येत्या सोमवारी याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिकेत बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्त जयस्वाल यांनी दिले. दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहातील सिंथेटिक ट्रॅकचा काही भाग दुरुस्तीसाठी काढण्यात आला आहे. त्यामुळे धावपटूंना पायऱ्यांवर सराव करावा लागत आहे. त्यामुळे मुलांच्या दुखापत होत आहे. तरीही धावपटू राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवत आहेत.

सेनेत नाराजीनाटय़

’शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू केल्यासंबंधीची पत्रकार परिषद घेण्यावरून महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिक्षण सभापती विकास रेपाळे यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

’‘सातत्याने अवमान होत आहे. या संदर्भात आयुक्त आणि पालकमंत्र्यांना पत्र पाठविले आहे,’ असे रेपाळे यांनी सांगितले. केव्हा अपमान केला, याचा खुलासा मागविणार असल्याचे महापौर शिंदे यांनी सांगितले.

’रेपाळे यांच्या पुढाकाराने सेलेब्रिटी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आल्यामुळे शुक्रवारी महापौर शिंदे यांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि स्थायी समिती सभापती राम रेपाळे हेसुद्घा उपस्थित नव्हते. त्यामुळे सेना नगरसेवकांतील गटातटाचे राजकारण चव्हाटय़ावर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 3:02 am

Web Title: parents create mess for not allowing stadium for running practice
Next Stories
1 पहिल्या वर्षांचा अर्थसंकल्प शेवटच्या वर्षांत!
2 पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
3 बेशिस्त रिक्षा, प्रवाशांना शिक्षा!
Just Now!
X