ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन प्रमुख शहरांमधील सुमारे १७७ रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करताना वाहनचालकांकडून पैसे आकारण्याचा जुनाच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा पोतडीबाहेर काढला असून चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी प्रति दोन तासांना १० रुपयांपासून थेट ५० रुपयांपर्यंत दर आकारण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव तयार करताना महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांची वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार नौपाडा आणि उथळसर परिसरातील रस्त्यांवर पार्किंग करणे वाहनचालकांच्या खिशाला जड जाणार आहे. विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी याच प्रस्तावाला मंजुरी देताना पालिकेतील गटनेत्यांनी पार्किंग शुल्कात सवलत देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबतचा अंतिम ठराव येण्यापूर्वीच प्रशासनाने जुना प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडून प्रशासनाने सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षांनाही अडचणीत आणले आहे.
ठाण्यातील बाजारपेठा, सरकारी कार्यालये, बँका, शाळा, उद्याने, तलाव अशा गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यांची रुंदी १८ ते २४ मीटपर्यंत मर्यादित असल्यामुळे या भागांत रस्त्याच्या कडेला वाहने उभी होताच मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगला शिस्त निर्माण व्हावी तसेच महापालिकेला त्यातून उत्पन्न मिळावे, अशी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील सुमारे १७७ रस्त्यांची विभागणी अ, ब, क, ड अशा चार संवर्गात करण्यात आली असून ‘अ’ संवर्गात मोडणाऱ्या रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणे महागडे ठरणार आहे. या प्रस्तावानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला दोन तासांच्या पार्किंगसाठी दुचाकी वाहनांना किमान २० रुपये तर चारचाकी वाहनांना ५० रुपये मोजावे लागतील. त्यानंतर प्रत्येक तासाला त्यामध्ये १० ते २० रुपयांची वाढ होणार आहे.
नौपाडय़ाचे रस्ते महाग
महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून वेगवेगळ्या संवर्गानुसार रस्त्यांची यादी तयार केली असून तब्बल २९ रस्त्यांचा समावेश ‘अ’ संवर्गात समावेश केला आहे. यामध्ये नौपाडा परिसरातील तब्बल २१ रस्त्यांचा समावेश अ, ब संवर्गात करण्यात आला असून उथळसर भागातील १५ रस्ते पार्किंगसाठी महाग ठरणार आहेत. मुंब्रा, कळवा भागातील ९५ टक्के रस्ते क, ड संवर्गात मोडणार असून तेथील रस्त्यांवर पार्किंगसाठी पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत दर पडणार आहे.

या रस्त्यांवर जास्त पार्किंग शुल्क
राम मारुती रोड, साने गुरुजी मार्ग, महात्मा फुले मार्ग, मुकुंद आगास्कर मार्ग, तीन हात नाका ते तीन पेट्रोल पंप, तीन पेट्रोल पंप ते वंदना टॉकीज, महापालिका भवन, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, जांभळी नाका, नितीन कंपनी, खोपट ते गोल्डन डाइज नाका, खोपट रोड ते गावदेवी चौक, कळवा पूल ते कोर्ट नाका, साकेत, रुतुपार्क, वागळे येथील रहेजा रस्ता, टीपटॉप प्लाझा, मूस रोड, अहिल्यादेवी मार्ग.