वाहनांवरील कारवाईविरोधात नागरिकांचा संताप; वसई-विरार महापालिका परिसरात वाहनतळच नाही

लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसई-विरार शहरात वाहनतळ नसतानाही पोलीस आणि महापालिका  प्रशासन अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जागाच निश्चित नाही तर वाहने  उभी कुठे करायची असा संतप्त प्रश्न वाहन चालक-मालकांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.

वसई-विरार शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. ही वाहने उभी करण्यासाठी शहरात कोणत्याही प्रकारचे वाहनतळ (पार्किंग झोन) तयार केले नाहीत. त्यामुळे  बहुतेक वाहने रस्त्याच्या कडेला, रस्त्यावर, पदपथाच्या बाजूला अशा सर्व ठिकाणी उभी केली जातात. तसेच रेल्वे स्थानकाच्या लगतच्या भागात, मुख्य रस्त्याच्या ठिकाणी अशा स्वरूपात वाहने  लावली जातात. यामुळे वाहतुकीस व येजा करण्यास अडथळा निर्माण होत असतो. यासाठी नुकताच अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर आता वाहतूक पोलीस व महापालिका कर्मचारी यांच्याकडून कारवाई सुरू करून वाहने उचलून दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला अधिकृत वाहने उभी करायची असेल तर अधिकृत वाहनतळ कोणत्या ठिकाणी आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रोड्रिक्स यांनी पालिकेचे साहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांच्याकडे विचारणा केली होती. परंतु खुद्द अधिकाऱ्यांनीच  आम्ही जागा शोधतोय, लवकरच तुम्हाला ती जागा कळवली जाईल असे उत्तर देण्यात आले.

वसई विरार महापालिका स्थापन होऊन ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अजूनही वाहने उभी करण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे धोरण तयार करण्यात आले नसल्याने नागरिकांनी वाहने उभी करायची तरी कुठे? जर पालिकेने अजूनही अधिकृत जागाच निश्चित केल्या नाही तर इतर ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. यांना अनधिकृत कसे काय ठरविले जात आहे. असाही प्रश्न रोड्रिक्स यांनी उपस्थित केला आहे.

पालिकेचा ‘पार्किंग टॉवर’चा प्रस्ताव

महापालिकेच्या वतीने वाहनांसाठी ‘पार्किंग टॉवर’ उभारण्याचा निर्णय घेण्यात  आला होता. यासाठी ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’मधून पार्किंग टॉवरचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. याबाबत मागील काही महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. यानुसार दोन ठिकाणी पार्किंग टॉवर प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली आहे.