कल्याण – डोंबिवलीतील रिक्षा वाहनतळ हे संघटनात्मक नसतील तर ते फक्त परवानाधारक रिक्षांसाठी असतील असे प्रादेशिक परिवहन विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद केल्याने या वाहनतळांवर संघटना पुढाऱ्यांची असलेली वषरेनुवर्षांची मक्तेदारी संपूष्टात येणार आहे. प्रस्तावित नसलेल्या या वाहनतळांवरकाही रिक्षा संघटनाच्या पुढाऱ्यांनी आपली मालकी प्रस्थापित केली होती.
डोंबिवलीत महापालिकेला खेटून असलेला रिक्षा वाहनतळ हा लालबावटा युनियनचा वाहनतळ म्हणून ओळखला जातो. रामनगरमधील वृंदावन हॉटेलसमोरचा रिक्षा वाहनतळ रिपब्लिकन रिक्षा संघटना, केळकर रस्त्यावरचा वाहनतळ शिवसेना, इंदिरा चौक परिसरातील वाहनतळावर भाजपचा वरचष्मा आहे. कल्याणमध्ये तर रिक्षा संघटनेचे मोठे नेते राहात असले तरी तेथील रिक्षाचालकांवर कोणत्याही संघटनेचे वर्चस्व नाही. मन मानेल तशी प्रवासी देणे, प्रवाशांना झुलवत ठेवणे हे प्रकार रिक्षाचालकांकडून सर्रास सुरू आहेत. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर हा रिक्षाचालकांच्या जहागिरीचा वाहनतळ म्हणून ओळखला जातो.
रिक्षा संघटनांच्या प्रत्येक स्वयंघोषित पुढाऱ्याने रस्ते, गल्लीबोळ अडवून रिक्षा वाहनतळ सुरू केले आहेत. या पुढाऱ्यांच्या पाठीमागे राजकीय बळ असल्यामुळे कोणीही वाहतूक, आरटीओ अधिकारी या वाहनतळांना हटविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील सर्व अनधिकृत रिक्षा वाहनतळ वाहतूक पोलिसांनी हटविले होते. त्यामुळे मुख्य वर्दळीचे रस्ते मोकळे झाल्याने रहिवासी समाधान व्यक्त करीत होते. परंतु वाहतूक अधिकारी बदलला की पुन्हा रिक्षाचालक आणि संघटनेच्या नेत्यांची पुन्हा दादागिरी सुरू होते आणि बेकायदा वाहनतळ सुरू केला जातो.
महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर, फडके रस्त्यावरील हॉटेलांसमोर, रामनगरमध्ये वृंदावन हॉटेलसमोर असे बेकायदा वाहनतळ काही पुढाऱ्यांचा आधार घेऊन सुरूकेले जातात आणि तेच अधिकृत वाहनतळ आहेत, असा देखावा उभा करून वाहतूक अधिकाऱ्यांना दटावण्याचे प्रकार मग रिक्षाचालकांचे नेते करतात, असा अनुभव वाहतूक अधिकाऱ्यांना आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने तयार केलेल्या अहवालात असे संघटनात्मक वाहनतळ कोठेही असता कामा नयेत, असा अभिप्राय दिला आहे. सुंदर नगरीच्या दिशेने वाटचाल करताना शहरातील रिक्षा वाहनतळांची समस्या मिटविणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे हा अहवाल देण्यात आला असून त्यावर वाहतूक शाखेकडून कोणती कार्यवाही केली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.