फेरीवाल्यांचेही पक्क्या नाल्यावर पुनर्वसन

कल्याण-पश्चिम रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. वाहने ठेवण्यासाठी रस्ते तसेच या भागातील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ अपुरा पडत आहे. वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेने कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागातून जाणारा जरीमरी नाला बंदिस्त करून त्यावर फेरीवाले व वाहनतळाची सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नाला बंदिस्त करणे तसेच त्यावर पहिल्या माळ्यापर्यंत बांधकाम करणे या कामांसाठी महापालिकेला ६० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च महापालिकेला आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नाही. त्यामुळे सार्वजनिक, खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)मधून हे बांधकाम करण्यात येणार आहे. ठेकेदाराला हे काम दिल्यानंतर तोच या प्रकल्पाचे कायमस्वरूपी नियोजन करणार आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा वर्दळीचा रस्ता महापालिकेने साठ फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर तेथे फेरीवाल्यांनी ठाण मांडू नये, तसेच हा रस्ता फक्त पादचारी आणि वाहनांसाठी मोकळा राहावा म्हणून प्रशासनाने या भागात नियमितपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांसाठी नाल्यावर बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

१९९१ मध्ये जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून महापालिकेने जरीमरी नाल्याची उभारणी केली आहे.  हा नाला काळा तलाव, संतोषी माता रस्ता, शिवाजी पथ, वलीपीर रस्ता, भानू सिनेमा, सांगळेवाडी, रहेजा पूल असा प्रवास करीत खाडीला मिळतो. १५ ते २० फूट रुंदीचा हा उघडा नाला आहे. त्यावर बांधकाम केल्यास वाहतूक कोंडी आणि गजबजाट कमी होणार आहे.

असे असेल बांधकाम..

लक्ष्मी भाजीबाजार ते वलीपीर रस्त्यादरम्यान ४०० मीटर लांब व २०० मीटर रुंदीचा नाला आहे. हा नाला दगडी आहे. तो तोडून तेथे ‘आरसीसी’ पद्धतीचे बांधकाम करायचे. या नाल्यावर स्लॅब व पहिल्या मजल्याचे बांधकाम करायचे. तळ मजल्याला फेरीवाल्यांची व्यवस्था व पहिल्या माळ्यावर वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ उभारायचा असा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त झाला पाहिजे, यासाठी महापौर व आयुक्त प्रयत्नशील आहेत, म्हणून हा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.