सॅटिसच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय; जागेचा विचार सुरू

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी रेल्वे स्थानक भागातील वाहनतळ दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार असून त्यासाठी वालधुनी पुलाजवळील जागा, रेल्वेची ब्रेकमन चाळ आणि तहसीलदार कार्यालयाच्या जागेचा विचार सुरू असून याबाबत पालिका, वाहतूक, रेल्वे, आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग, राज्य पोलीस, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय, तहसीलदार यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमधील बहुतांशी कर्मचारी दुचाकी वाहने घेऊन कार्यालयात येतात. या कर्मचाऱ्यांची वाहने त्यांच्या कार्यालय परिसरातील आवारात किंवा पालिका, रेल्वेच्या वाहनतळांवर उभी केली जातात. त्यामध्ये दररोज दीड हजार वाहने ही पोलिसांची असतात, असे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळ रेल्वेच्या हद्दीत दीड ते दोन हजार वाहनांचे वाहनतळ आहे. त्याच्या बाजूला पालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ आहे. हे सर्व वाहनतळ वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गजबजून गेलेले असतात. कल्याण रेल्वे स्थानकातून अनेक प्रवासी नाशिक, डहाणू, मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरात प्रवास करतात. हे प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीने प्रवास करतात आणि स्थानकाजवळील वाहनतळामध्ये दुचाकी उभी करतात. कल्याण न्यायालयाच्या आवारात प्रशस्त जागा असल्याने या जागेत न्यायालयीन कर्मचाऱ्यांपेक्षा इतर विभागातील खासगी, सरकारी कर्मचारी घुसखोरी करून वाहने लावतात. त्यामुळे न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या वकील, अशिलांना न्यायालयाच्या आवारात वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. ही घुसखोरी न्यायालय आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे मोडून काढली. त्यामुळे आता बहुतांशी वाहने न्यायालयाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या भागात वाहनकोंडी होते.

सॅटिसचे काम सुरू झाल्यानंतर कल्याण सत्र न्यायालयापासून ते साधना हॉटेल वलीपीर रस्त्यापर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे. आगाराची जागा विकसित केली जाणार आहे. आगाराच्या जागेत येत्या काळात रिक्षा वाहनतळ, एस. टी. आणि रेल्वे स्थानकातून येणाऱ्या प्रवाशाला थेट आगारातील जागेत येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पालिकेकडून हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी या भागातील रिक्षा, रेल्वे, पालिकेच्या वाहनतळांची सुविधा कोठे करता येईल, याचा विचार सुरू आहे. त्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट, उपायुक्त पल्लवी भागवत, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, रेल्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. प्रमोद जाधव, आरटीओचे प्रतिनिधी यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली. त्यामध्ये रेल्वेचा वाहनतळ, महात्मा फुले पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, रेल्वेची ब्रेकमन चाळ, वालधुनी पुलाजवळील रेल्वेची मोकळी जागा परिसराची पाहणी करण्यात आली. पोलिसांची वाहने पोलीस वसाहतीच्या जागेत ठेवता येतील का याचा विचार करण्यात आला. रेल्वेची ब्रेकमन चाळ तोडून तेथे वाहनतळाची तात्पुरती सुविधा केली तर रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळावरील वाहने तेथे ठेवता येतील. तहसीलदार कार्यालयाचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अन्य जागेत स्थलांतर केले तर या जागेत वाहने उभी करण्यास मुबलक जागा उपलब्ध होणार आहे, असाही विचार पाहणीच्या वेळी करण्यात आला.

रेल्वे स्थानक भागातील एसटी, केडीएमटीच्या बससेवेचे नियोजन कसे करता येईल. रिक्षा वाहनतळ, १५० मीटरच्या बाहेरील फेरीवाल्यांना कुठे बसविता येईल, याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी सांगितले.