03 June 2020

News Flash

रेल्वेचा बोगदा अजूनही पारसिक!

पारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने वारंवार लावून धरला होता.

पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भास्कर नगर आणि वाघोबा नगर या वस्त्यांमधून शेकडो किलो कचरा दर दिवशी रेल्वेमार्गावर टाकण्यात येत असल्याचे दिसते.

 

* कळव्याच्या बाजूला कचऱ्याचा ढीग * मुंब्य्राजवळील संरक्षक भिंतीचाही पत्ता नाही

बेकायदा बांधकामे आणि कचऱ्याच्या भाराने खचत चालल्याची भीती असलेल्या मध्य रेल्वेमार्गावरील पारसिक बोगद्याजवळ दोन दुर्घटना होता होता वाचल्या असल्या तरी, या ठिकाणच्या परिस्थितीचे गांभीर्य अद्याप प्रशासकीय यंत्रणांना उमजलेले नाही. आठ महिन्यांपूर्वी या बोगद्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली होती. ही संरक्षक भिंत बांधण्यासाठी अजूनही ठाणे महापालिकेला मुहूर्त सापडला नसून येत्या पावसाळ्यापर्यंत ही भिंत बांधली गेली नाही, तर पावसाळ्यात धोकादायक परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या बोगद्यावर आणि परिसरात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही अधांतरीच आहे.

पारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने वारंवार लावून धरला होता. त्यानंतर रेल्वेने या बोगद्याचे सर्वेक्षण करण्याची विनंती नागपूरच्या सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटला केल होती. बोगद्याच्या आतील भागाबरोबरच बोगद्यासभोवतालची स्थितीही अत्यंत वाईट असून जून २०१६मध्ये पावसाळ्याच्या दिवसात मुंब्य्राजवळील बोगद्याच्या वर असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता. त्या वेळी ऐन दुपारी रेल्वेने चार तासांचा विशेष ब्लॉक घेत ठाणे महापालिकेच्या मदतीने ही भिंत पाडली होती.

या घटनेनंतर ठाणे महापालिका, रेल्वे आणि वनविभाग यांनी बोगद्याच्या वरच्या भागात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्धारही केला होता. ठाणे पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी कळव्याच्या दिशेकडे भेट देत कचरा हटवण्याची मोहीमही सुरू केली. कालांतराने अनधिकृत बांधकामे आणि कचरा हटवण्याचा निर्धार हवेत विरला असल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता ठाणे महापालिका हद्दीतील ही अनधिकृत बांधकामे आणि कचरा हटवण्याबद्दल पालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले.

आजचे चित्र

* पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या भास्कर नगर आणि वाघोबा नगर या वस्त्यांमधून शेकडो किलो कचरा दर दिवशी रेल्वेमार्गावर टाकण्यात येत असल्याचे दिसते.

* हा कचरा तसाच पडून असून त्यामुळे रेल्वेमार्गालाही धोका निर्माण झाला आहे.

* मुंब्य्राच्या दिशेला असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठीही पालिकेला मुहूर्त सापडलेला नाही.

* या भागात वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेतील अनधिकृत बांधकामावरही काहीच कारवाई झालेली नाही.

पारसिक बोगद्याजवळील कचरा उचलण्यात येतो, मात्र नागरिक त्या भागात पुन्हा कचरा टाकतात. तसेच संरक्षक भिंत बांधण्यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास रेल्वे विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीसाठी आर्थिक तरतूद करून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.

-संदीप माळवी, ठाणे महापालिका उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:46 am

Web Title: parsik tunnel garbage near parsik tunnel garbage on tracks
Next Stories
1 मुंब्रा चौपाटीला गती!
2 बदलाच्या क्षितिजावर मिळून सातजणी..
3 बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Just Now!
X