नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; कामकाजावर प्रश्नचिन्ह

वसई : नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत नव्याने विकसित झालेल्या सनटेक इमारतीजवळ भूस्खलन होऊन भाग खचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसऱ्यांदा या भागात अशा प्रकारची घटना घडल्याने येथील कामकाजावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत सनटेक परिसर आहे. हा परिसर टीवरी ग्रामपंचायत हद्दीत येतो. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. त्याला पालिकेच्या विशेष प्राधिकरण नगररचना विभागाकडून परवानगी दिली आहे. त्यातील काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. त्यामधील काही सदनिकांमध्ये हळूहळू नागरिक राहण्यास येत आहेत.

परंतु शनिवारी मध्यरात्री २२ मजली इमारतीच्या जवळील जमिनीचा भाग खचून गेल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच इमारतीमध्ये राहणारे रहिवासी तातडीने खाली उतरले. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

या घटनेत सुदैवाने जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ३० ते ४० फूट जमिनीचा भाग खचून गेला होता. विकासकांच्या निष्काळजीमुळे असा प्रकार घडला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. वर्षभरापूर्वी याच इमारतीच्या मागील बाजूस जमिनीचा भाग खचल्याची घटना घडली होती. इतक्या मोठ्या इमारती उभारल्या जातात, परंतु जागेचे योग्य ते नियोजन होत नाही. पालिकेनेही इतक्या मोठ्या इमारतींना परवानगी देताना संपूर्ण भागाची माहिती करूनच त्यांना परवानगी देणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. घडलेल्या घटनेच्या ठिकाणी संबंधित भागात कार्यरत असलेले अभियंता यांना पाठवून त्या ठिकाणची माहिती घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे विशेष प्राधिकरण विभागाचे सहायक आयुक्त सुरेंद्र पाटील यांनी सांगितले.

‘पालिकेने पाहणी करावी’

या भागातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने या भागात टोलेजंग इमारती उभारणी करण्यासाठी या जागेची योग्य ती पाहणी केली होती का, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी पालिकेच्या नगरविकास विभागाकडून या इमारतींची पाहणी करण्यात यावी नागरिकांना राहण्यास योग्य आहेत किंवा नाही याची खात्री करावी मगच या विकासकांना पुढील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

पालिकेकडून विकासकाला काम थांबविण्याचे आदेश

नायगाव पूर्वेतील टीवरी रस्त्यालगत नव्याने विकसित झालेल्या सनटेक इमारतीजवळील भूस्खलन होऊन भाग खचला होता. या घटनेनंतर पालिकेच्या नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पाहणी केली आहे. पाहणीदरम्यान सांडपाणी प्रक्रियेच्या कामसाठी उत्खनन सुरू  केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामुळे येथील रस्ता व इमारतीला याचा फटका बसला असून हे कामकाज थांबविण्यात यावे, असे आदेश पालिकेच्या नगरविकास विभागाने विकासकाला दिले आहेत. तसेच या ठिकाणचे लेखापरीक्षण व तपासणी अहवाल सादर करण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे.